Monday, February 25, 2008

"त्या' पोलिसांवर कारवाई योग्य ठरेल का? प्रतिक्रिया नोंदवा....

कचरा उचलला
पालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पणजी, ता. 25, प्रतिनिधी - मोन्सेरात कुटुंबीयांना व इतरांना केलेल्या मारहाणीमुळे पोलिसांविरुद्ध पालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनापुढे आज अखेर सरकारने नमते घेतले. पोलिस अधीक्षक मोहन नाईक, निरीक्षक सुदेश नाईक यांची त्वरित अन्यत्र बदली करण्याचा निर्णय आज सरकारने घेतला. पूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी जाहीर केले. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी आज संप मागे घेतला आणि कचरा उचलण्याचे काम पणजीत रात्री सुरू झाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, नगर विकास मंत्री ज्योकिम आलेमाव, मुख्य सचिव जे. पी. सिंग आदींची आज बैठक झाली. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे ठरले. मुख्यमंत्री व अन्य दोघे मंत्री नंतर इस्पितळात जाऊन महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनाही भेटले. तुम्हाला मारहाण केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी रॉड्रिग्ज यांना दिली.
संप मिटला असून राजधानीतील कचरा रात्रीपासूनच उचलला जाईल असे हंगामी महापौर यतीन पारेख व पालिका कामगार संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी जाहीर केले. त्यानंतर रात्री कचरा उचलणेही सुरू झाले.
गेल्या 19 रोजी पणजी, ताळगावात जे घडले त्यासंदर्भात आपल्याकडे बऱ्याच तक्रारी आल्या असून कायदेशीर सल्ला घेऊन चौकशीचा आदेश जारी केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कायदा कोणालाही हाती घेऊ दिला जाणार नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला. न्यायालयीन चौकशी होणार का? फक्त लोकप्रतिनिधींना केलेल्या मारहाणीचे तपासकाम केले जाईल का? असे प्रश्‍न पत्रकारांनी विचारले असता, त्याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असून चौकशी पूर्ण प्रकरणाची होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पणजीतील कचरा व्यवस्थापनासाठी जागा देण्याची प्रक्रिया जलदगतीने होईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दुपारी नगरसेवकांबरोबर झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती त्यांनी
दिली.
-----------------------------------------
निलंबनच हवे - आजगावकर
दरम्यान, लोकप्रतिनिधींना मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची केवळ बदली होणे पुरेसे नाही. त्यांना सेवेतून निलंबितच करावे, अशी मागणी पंचायत मंत्री बाबू आजगावकर यांनी केली आहे. आम्ही मंत्र्यांनी तशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली असल्याचे ते म्हणाले. पोलिसांना ज्यांनी मारहाण केली, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करावेत पण पोलिस अशा प्रकारे कुणालाही बेदम मारहाण करू शकत नाहीत, असे आजगावकर म्हणाले. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मात्र अखेर न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Friday, February 22, 2008

पालिका कर्मचाऱ्यांची कचरा न उचलण्याची भूमिका योग्य आहे का? प्रतिक्रिया नोंदवा।







पणजीतील कचरा उचलणे बंद
कर्मचारी संपावर - महापौर मारहाणीचा निषेध
पणजी, ता। 22, प्रतिनिधी -
महापौर टोनी रॉड्रिग्ज तसेच आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्रशासन व सफाई कामगार संघटनेने बेमुदत संप सुरू केला आहे. संपाची घोषणा आज दुपारी करण्यात आली, तरी कचरा उचलण्याचे काम काल रात्रीपासूनच बंद असल्याने पणजीत सर्वत्र कचरा साठला आहे. मारहाणीस जबाबदार असलेल्या पोलिसांविरुद्ध सरकारने कडक कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. व्हिंटेज इस्पितळात उपचार घेत असलेले टोनी रॉड्रिग्ज यांची स्थिती नाजूक आहे. अजूनही ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. पोलिसांनी बेदम मारहाण करून 19 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या इस्पितळाच्या दारात नेऊन त्यांना टाकले. शहराच्या प्रथम नागरिकाला पोलिसांकडून मिळालेली वागणूक संतापजनक आहे. या एकंदर प्रकरणी पोलिसांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करावा. महापौरांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांविरुद्ध तक्रार नोंदविली जाणार आहे। आवश्‍यकता भासल्यास महापालिका मंडळातर्फे पोलिसांत तक्रार नोंदविली जाईल, असे कार्यकारी महापौर यतीन पारेख आज पत्रकार परिषदेत सांगितले.पणजीतील नगरसेवक व आयुक्तांची आज सकाळी बैठक झाली. यावेळी महापौरांच्या अनुपस्थितीमुळे दैनंदिन कामकाजासाठी महापौरपदाचा ताबा आपल्याकडे सोपविण्यात आल्याचे पारेख यांनी सांगितले. बेदम मारहाणीमुळे त्यांची जी स्थिती झाली आहे त्याचा परिणाम महापालिका कर्मचाऱ्यांवर झाला आहे. महापौरांना तसेच मोन्सेरात कुटुंबीयांना झालेली मारहाण व त्यांच्या मालमत्तेच्या तोडफोडीबाबत न्यायालयीन चौकशी करून यास जबाबदार ठरणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंद करावा. मारहाणीत गुंतलेल्या पोलिसांची बदली करून कारवाई केल्याचे नाटक न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक अविनाश भोसले यांनी केली. मोन्सेरात कुटुंबीय व महापौरांना झालेल्या मारहाणीची मानवी हक्क आयोगानेही दखल घेऊन जबाबदार पोलिसांविरुद्ध कडक कारवाईची मागणी नगरसेवक रेजिना आल्मेदा यांनी या पत्रकार परिषदेवेळी केली.दरम्यान, या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिका कामगार संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला, असे संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी कळविले आहे. लोकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.



Wednesday, February 20, 2008

ताळगावचे राजकारण गोव्याला कोठे घेऊन जाणार? आपल्या प्रतिक्रिया नोंदवा।


बाबूश-पोलिस धुमश्‍चक्री

बंगल्यांची झडती व तोडफोड
पणजी, ता. 19, प्रतनिधी - एका तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर आज ताळगावमध्ये मोठा वाद झाला आणि त्याची परिणती शेवटी पणजी पोलिस स्थानकावरच हल्ला करण्यात झाली. तरुणाला मारहाण करणाऱ्यांना अटक करावी म्हणून पोलिस स्थानकावर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली ताळगाववासीयांनी नेलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतले. यावेळी पोलिस स्थानकाजवळील तीन वाहने जाळण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधूर सोडत लाठीमारही केला. शिवाय हवेतही गोळीबार करण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पोलिस स्थानकावर केलेल्या दगडफेकीत वीस पोलिस जखमी झाले. सांपॉल - ताळगाव येथे रायन गुदिन्हो (20) नावाच्या एका तरुणाला आज दुपारी एका गटाने सळईने मारहाण केली. यामुळे हल्लेखोरांना अटक करा, अशी मागणी करत ताळगाववासीयांनीपणजी पोलिस स्थानकावर मोर्चा नेला. संध्याकाळी ताळगाव बंदची हाक देण्यात आली आणि बहुतेकांनी आपली दुकाने वगैरे बंद केली. बाबूश मोन्सेरात, महापौर टोनी रॉड्रिग्ज, नगरसेवक दया कारापूरकर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
--------------------
बंगल्यांची झडती व तोडफोड

पणजी, ता. 19, प्रतनिधी - पणजी पोलिस स्थानकावर मोर्चेकऱ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला व त्यामुळे जमाव पांगला. मात्र लगेच प्रत्युत्तरादाखल पोलिसही बरेच आक्रमक बनले. आमदार बाबूश मोन्सेरात, त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात व त्यांच्या एका मुलासह महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी मोन्सेरात यांच्या ताळगाव व मिरामार येथील बंगल्यांचीही झडती घेतली. तेथील बाबूश यांच्या आलिशान वाहनांची मोडतोड करण्यात आल्याचे मोन्सेरात समर्थकांनी सांगितले. पोलिस स्थानकावर बाबूश व टोनी यांना मारबडव करण्यात आल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.रात्री उशिरा ताळगावमध्ये वातावरण अधिक तंग झाले तर पणजी पोलिस स्थानक परिसराला युद्धभूमीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी बाबूश यांच्या ताळगाव व मिरामार बंगल्याची झडती घेतली. पणजी पोलिसांनी अगोदर बाबूश यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यामुळे जेनिफर स्वतः पोलिस स्थानकावर आल्या असता, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर बाबूश व टोनी आले व त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस स्थानकाबाहेर बघ्यांची गर्दी जमत होती. मात्र गटागटाने लोक जमू लागल्यानंतर पोलिस जमावाच्या मागे धावत येऊ लागले व मग लोकही मिळेल त्या वाटेने पळू लागले. यावेळीही थोडा लाठीमार झाला.बाबूशची वाहने फोडण्यात आल्याने त्यांच्या ताळगाव येथील बंगल्यासमोर काचांचा खच पडल्याचे दिसत होते. एकंदरीत ताळगाव प्रकरण आता अधिक गंभीर बनले आहे. पोलिस स्थानकावर काहीजणांना मारबडव झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, पणजी पोलिस स्थानकावरील हल्ल्यावेळी वीस पोलिस जखमी झाले होते. त्यापैकी दोघांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.

Monday, February 18, 2008

"सहा पदरी जलदगती मार्ग' प्रश्‍नी चर्चिल आलेमांव यांचा घुमजाव. आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.

सहापदरी मार्ग होणार
चर्चिल - नव्याने सर्वेक्षण करण्याची घोषणा
पणजी ता, 18, प्रतिनिधी -
राज्यात सहापदरी जलदगती मार्ग प्रकल्पाऐवजी आता पत्रादेवी ते पोळेपर्यंत सहापदरी मार्ग बांधण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे केले जातील, असे आज बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. विरोधात असताना मात्र आलेमाव हे नेहमीच सहापदरी मार्गाला विरोध करत होते.प्रस्तावित सहापदरी मार्ग लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करणारा ठरणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असून, लवकरच या प्रकल्पासाठी खास सर्वेक्षण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. सहापदरी जलदगती मार्गासाठी राज्यातील अनेक घरे जमीनदोस्त करावी लागणार होती. त्यामुळे या प्रकल्पाऐवजी घरे नाहीत अशा जमिनीतून सहापदरी रस्ता न्यावा, असे खात्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, कुठ्ठाळी ते मडगावपर्यंत चौपदरी रस्ता बांधण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. रस्त्यांचा विस्तार व विकास करीत असताना जनतेला त्याचा मनस्ताप होणार नाही याची काळजी खाते घेणार आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी सरकारकडे काहीच निधी नव्हता. त्यासाठी आपण केंद्राकडून निधी मिळविला असून, आता कुळे ते पर्तगाळ व पर्तगाळ ते माशेपर्यंतचा महामार्गाचा विकास करण्यात येईल, असे आलेमाव यांनी सांगितले. केंद्राकडून महामार्गाच्या विकासासाठी 14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोन्ही रस्त्यांसाठी अनुक्रमे तीन कोटी 19 लाख 55 हजार 428 रुपये व दोन कोटी 62 लाख 52 हजार 840 रुपये अंदाजित खर्च येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या कायमची निकालात काढण्यासाठी दक्षिण गोव्यात समांतर जलवाहिनी बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतींना आतापर्यंत प्रक्रिया करण्यात आलेले पाणी पुरविले जायचे. अशा पाण्याची उद्योगांना गरज नसल्याने यापुढे समांतर जलवाहिनीद्वारे त्यांना प्रक्रिया न केलेले पाणी पुरविले जाईल. त्यामुळे बचत होणार आहे, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले.सार्वजनिक नळांमुळे सुमारे 25 ते 35 एमएलडी पाणी वाया जाते. हे पाणी वाचविण्यासाठी सार्वजनिक नळ काढून टाकून प्रत्येकाला स्वतंत्र व मोफत नळजोडणी देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

फॅक्‍टरीतील घातक टाकाऊ पदार्थ नदीत सोडणे योग्य आहे का? प्रतिक्रिया नोंदवा.

विषबाधेने नदीतील मासे मृत
कुंभारजुवे पंचायत - प्रदूषण मंडळ व पोलिसांना माहिती
पणजी, ता. 18, प्रतिनिधी - रामभुवन वाडा - कुंभारजुवे येथील एका मासळी प्रक्रिया प्रकल्पातील टाकाऊ घातक द्रवपदार्थ नदीत सोडण्यात आल्याने त्याची विषबाधा होऊन मोठ्या प्रमाणात मासे मेले. मेलेले मासे पाण्याबरोबर किनाऱ्यावर येऊन पडले आहेत. या प्रकाराची माहिती कुंभारजुवे पंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ व फोंडा पोलिस स्थानकाला दिली आहे. उद्यापर्यंत यासंदर्भात संबंधित खात्यांमार्फत कारवाई सुरू होण्याची शक्‍यता आहे. नदीतील मासे मरून किनाऱ्यावर पडले असल्याची माहिती आज सकाळी तेथील एका स्थानिकाने पंचायतीच्या कारकुनाला दिली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सरपंच सुरेश नाईक व कारकुनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नदीत काही मेलेले मासे पाण्यावर तरंगत होते, तर काही किनाऱ्यावर पडले होते. हा मासळी प्रक्रिया प्रकल्प या नदीच्या बाजूलाच आहे. त्यामुळे या प्रकल्पातून सोडलेले घातक रसायन नदीच्या पाण्यात मिसळून हा प्रकार घडला असण्याची शक्‍यता पंचायतीतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. या नदीतील मासे स्थानिक लोक धरतात, मात्र या घटनेमुळे लोकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. या प्रकाराची माहिती बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्र, जुने गोवे पोलिस स्थानक, कुंभारजुव्याचे आमदार व मंत्री पांडुरंग मडकईकर यांना देण्यात आली आहे. आरोग्य केंद्र व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना या नदीच्या पाण्याचा नमुना घेऊन त्याची तपासणी करण्याची विनंती पंचायतीतर्फे करण्यात आली आहे.

Saturday, February 16, 2008

"वेग नियंत्रक सक्ती'' स्थगित ठेवणे, योग्य आहे का? आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.

वेग नियंत्रक सक्ती स्थगित
पणजी, ता. 16, प्रतिनिधी - राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने अवजड वाहनांना वेग नियंत्रक लावण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतल्यावर अखेर सरकारला तो स्थगित ठेवावा लागला. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्याने त्यात व्यत्यय येऊ नये यास्तव वेग नियंत्रकांची सक्ती तूर्त स्थगित ठेवण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि वाहतूक मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.वेग नियंत्रक सक्तीला ट्रक व बस मालकांकडून केल्या जाणाऱ्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी कॉंग्रेस- राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांसह मंत्री मडकईकर, गृहमंत्री रवी नाईक, महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा, आमदार नीळकंठ हळर्णकर बैठकीस उपस्थित होते. वेग नियंत्रक सक्ती चौदा दिवसांत मागे घेतली नाही तर, संपावर जाऊ असा इशारा गेल्या 4 रोजी बस, ट्रक, टॅंकर मालकांनी दिला होता. संपाला प्रत्युत्तर म्हणून सरकारने दोन दिवसांपूर्वीच राज्यातील बस व मालवाहतूक अत्यावश्‍यक सेवा कायद्याखाली आणली होती. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली व सध्या मुलांच्या परीक्षेचे दिवस असल्याने प्रवासी वाहतुकीबाबत गोंधळ निर्माण होणे परवडणारे नाही, असा विचार बैठकीत व्यक्त झाला. तसेच तूर्त वेग नियंत्रक सक्ती मागे घ्यावी, असे ठरवण्यात आले.वाहनांना वेग नियंत्रक लावण्याचे काम भविष्यात केवळ दोन कंपन्यांनाच नव्हे तर अन्यही कंपन्यांना हवे तर देता येईल. एवढेच नव्हे तर अन्य राज्यांतही वेग नियंत्रक लावण्याची सोय असल्याने तेथेही नियंत्रक खरेदी करून ते लावता येतील. याबाबतचे सर्व व्यवहार पारदर्शक आहेत, असे मडकईकर यांनी सांगितले.दरम्यान, ही सक्ती स्थगित ठेवण्याच्या निर्णयाचे म.गो. पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी स्वागत केले आहे.सरकारने वेग नियंत्रक सक्तीचा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण अभ्यास करावा, अशी सूचना आम्ही केली होती. हा निर्णय स्थगित ठेवून सरकारने अवजड वाहनधारकांना दिलासा दिला आहे, असेही राऊत म्हणाले।
-------------------------------------------------------------------------------------------------
सामान्य जनतेला त्रास नको म्हणून आम्ही वेग नियंत्रक सक्ती स्थगित ठेवत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। वेग नियंत्रक सक्तीमुळे आपल्यावरही गैरव्यवहाराचे आरोप करण्यात येत होते। वास्तविक रस्त्यावर पडणारे बळी रोखण्यासाठी आपण वेग नियंत्रकाची सक्ती केली होती. अन्य राज्यांतही अशी सक्ती आहे. वेग नियंत्रक पद्धतीपेक्षा आपल्यालाच टीकेचे लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, असेही मडकईकर म्हणाले.
-------------------------------------------------------------------------------------------------

भारतातही अशा स्वरूपाची उपाययोजना करावी का? आपली मते ब्लॉगवर कळवा.

ब्रिटनमध्ये धूम्रपानासाठी


आता परवाना लागणार
लंडन, ता. 16 पीटीआय -ब्रिटनमध्ये धूम्रपान करणार आहात? मग त्यासाठी यापुढे तुम्हाला ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाकडून परवाना काढावा लागण्याची शक्‍यता आहे. कारण सिगारेट विकत घेण्यासाठी परवाना असणे बंधनकारक करण्याचा कायदा करण्याची शिफारस ब्रिटन सरकारच्या आरोग्यविषयक सल्लागार समितीने केली आहे. मात्र, धूम्रपान करणाऱ्यांच्या संघटनांनी याला विरोध केला आहे.या परवान्याशिवाय कोणीही धूम्रपान करू शकणार नाही. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी होईल, असे सल्लागार समितीचे अध्यक्ष ज्युलियन ले ग्रॅंड यांनी सांगितले. ते म्हणाले, ""धूम्रपान करणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी सत्तर टक्के ही सवय सोडून देण्याच्या मनःस्थितीत असतात. हा परवाना मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे आणि यानंतर वाढणाऱ्या खर्चामुळे अनेक जण धूम्रपान टाळणेच पसंत करतील.''या प्रत्येक परवान्यासाठी आवश्‍यक 10 डॉलर शुल्कातून जमा होणारा निधी राष्ट्रीय आरोग्य योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याचे ग्रॅंड यांनी सांगितले. तंबाखूजन्य पदार्थांचे नियमन करण्यासाठी भविष्यात अशा प्रकारची योजना असण्याच्या शक्‍यतेचा आरोग्य विभागाच्या प्रवक्‍त्यांनीही इन्कार केला नाही.

Thursday, February 14, 2008

"सेलेब्रिटी' कायद्यापेक्षा वरचढ आहेत का? प्रतिक्रिया नोंदवा.

संजय-मान्यता विवाह
बनावट कागदपत्रे प्रकरणी तलाठी निलंबित
"मेमो' स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कारवाई

मडगाव, ता। 14 प्रतिनिधी -अभिनेता संजय दत्त व मान्यताच्या विवाह नोंदणीसाठी चुकीच्या माहितीच्या आधारे रहिवासी दाखला दिलेला तलाठी प्रशांत कुंकळकर याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या दाखल्यासंबंधी मामलेदारांना अंधारात ठेवल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले आहे. सासष्टीचे मामलेदार परेश फळदेसाई यांनी यासंबंधी जारी केलेला "मेमो' स्वीकारण्यास नकार दिल्याने जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी आज कुंकळकर याला निलंबित करण्याचा आदेश जारी केला.संजय दत्त व मान्यता उर्फ दिलनशीन अमीर अहमद शेख यांच्या विवाहाची नोंदणी येथील उपनिबंधकांनी केली आहे. या नोंदणीसाठी संजय दत्त व मान्यता यांचे वास्तव्य मडगावात असल्याचा दाखला तलाठी कुंकळकर यांनी दिला होता. त्याबाबत मामलेदार फळदेसाई यांनी कुंकळकर याला "मेमो' देऊन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. कुंकळकर याने "मेमो' स्वीकारण्यास नकार दिल्याचा अहवाल आज सकाळी मामलेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कुंकळकरच्या निलंबनाचा आदेश जारी केला.तलाठ्याने दाखला प्रकरणी मनमानी केली आणि मामलेदारांनाही अंधारात ठेवले, असे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यास तलाठ्याला सेवेतून बडतर्फ केले जाईल आणि त्याने दिलेले दाखले रद्द करण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विवाह नोंदणी कार्यालयाचे उपनिबंधक चंद्रकांत पिसुर्लेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी 2008 रोजी संजय दत्त व मान्यता विवाह नोंदणीसाठी कार्यालयात आले होते. शिवानंद राया कदम व भूषण शिवानंद कदम हे आके येथील व शिवानंद नाईक (रा. म्हापसा) त्यांच्यासोबत होता.

-----------------------------------------------------------------------------------------------
विवाह नोंदणीस आक्षेप
संजय दत्त व मान्यताच्या विवाह नोंदणीस पत्रकार ज्योकी ग्रासीयस यांनी आक्षेप घेतला असून यासंबंधी येथील उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे. संजय दत्त व मान्यता गोव्याच्या रहिवासी नाहीत. गोव्यातील त्यांच्या वास्तव्यासंदर्भात दिलेले दाखले चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. त्यामुळे या विवाहाची नोंदणी गोव्यात होऊ शकत नाही. हे दाखले देताना तलाठ्याने अधिकारपदाचा गैरवापर केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे।

-------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, February 12, 2008

गोव्यात मंत्रिमंडळ पुर्नरचनेची गरज आहे का? आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.

सल्ला सोनियांचा
सर्वांशी सल्लामसलत करा
मुख्यमंत्री - राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आज चर्चा


पणजी, ता. 12, प्रतिनिधी - मंत्रिमंडळातून कोणत्याही मंत्र्याला वगळण्याच्या निर्णयापूर्वी सर्व संबंधित नेत्यांशी विचारविनिमय करा, असा सबुरीचा सल्ला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना दिला. मुख्यमंत्री उद्या (बुधवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करतील अशी दाट शक्‍यता आहे.
कामत यांच्यासह अर्थमंत्री दयानंद नार्वेकर, बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव, वाहतूक मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आज दिल्ली गाठली. तीन दिवसांची गोवा भेट आटोपून कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हरिप्रसाद हेही दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्र्यांसोबत हरिप्रसाद यांनी श्रीमती गांधी यांची भेट घेतली. मंत्रिमंडळातून कोणत्याही मंत्र्याला वगळण्याचा प्रयत्न सरकारच्या अंगलट येऊ शकतो, अशी कल्पना मुख्यमंत्र्यांनी श्रीमती गांधी यांना दिली. कोणताच मंत्री राजीनाम्यास तयार नाही. सक्तीने कोणत्याही मंत्र्याला वगळल्यास सरकारचे स्थैर्यच धोक्‍यात येऊ शकते, असे मत हरिप्रसाद यांनी श्रेष्ठींसमोर व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोव्यातील राजकीय वाद संपुष्टात आणण्यासाठी मार्गदर्शन करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी श्रीमती गांधी यांना केली. सर्व ज्येष्ठ कॉंग्रेस व अन्य नेत्यांशी सल्लामसलत करा आणि नंतरच काय तो निर्णय घ्या, असा सल्ला श्रीमती गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
कोणत्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढायचे याचा निर्णय झालेला नाही. आपण आणखी सल्लामसलत करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून "गोमन्तक'ला सांगितले. म.गो.चे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेण्यात अडचणी येत असल्याने मुख्यमंत्री उद्या राष्ट्रवादीच्या दिल्लीतील अन्य ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतील, अशी शक्‍यता आहे. पवार यांना भेटूनच कामत गोव्याला परततील, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची आज नियोजन आयोगासोबतही बैठक झाली. येत्या 22 रोजी मुख्यमंत्र्यांची बैठक नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अहलुवालिया यांच्याबरोबर होणार आहे. कामत यांनी केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीही आज भेट घेतली.

Monday, February 11, 2008

मुरगाव बंदराचा विस्तार गोव्यासाठी गरजेचा आहे का? प्रतिक्रिया नोंदवा.

"वास्को बंद'ला चांगला प्रतिसाद अभियानचा दावा
दोन्ही बाजूंच्या कडक भूमिकेमुळे स्थिती "जैसे थे'
वास्को, ता. 11 प्रतिनिधी - कोळसा प्रदूषण आणि विस्तारवाद यासंदर्भात केलेल्या मागण्यांची "एमपीटी'कडून (मुरगाव पोर्ट ट्रस्ट) न झाल्याच्या निषेधार्थ "मुरगाव बचाव अभियान'ने आज पुकारलेल्या "बंद'ला उत्तम प्रतिसाद मिळाला. तथापि, कोणताही तोडगा न निघाल्यामुळे मूळ प्रश्‍न अजूनही "जैसे थे' आहे.मुरगाव बंदरातील निरनिराळ्या जहाजांभोवती नौकांनी गराडा घातला, तर बंदराकडे जाणाऱ्या मार्गावर पिकअप आडवे ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुरगाव बंदरातील व्यवहार ठप्प झाले. परिणामी एमपीटीला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. सडा, नवे वाडे, शहर भाग, बायणा मांगोरहिल व परिसरातील सर्व व्यवहार व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून "मुरगाव बचाव अभियान'ला पाठिंबा दर्शवला. सडा भागातील मिनी बस सेवा वगळता इतर भागांतील बस सेवा सुरळीत सुरू होती.अखिल गोवा बार्ज मालक संघटना अखिल गोवा मच्छिमारी बोट मालक संघटना, लॉंच मालक संघटना, बायणातील रापणकार व होडी मालक संघटना, वाडे नागरिक समिती, सडावासीय यांनी संयुक्तरीत्या बंदची हाक दिली होती. एमपीटीच्या विविध प्रकल्पांमुळे येथील पारंपरिक व्यवसायांवर तसेच रहिवाशांवर मोठा परिणाम होण्याची भीती "अभियान" ला वाटत आहे. यास एमपीटीचे अध्यक्ष कारणीभूत असल्याचा आरोप अभियानने केला होता. बंद यशस्वी होण्यासाठी अभियानने काल रात्रीपासूनच तयारी केली होती. ट्रॉलर्स (स्वयंचलीत मच्छीमारी नौका) व बोट मालक यांनी मच्छिमारीसाठी न जाता काल रात्रीपासून आपले ट्रॉलर्स व बोट समुद्रात नांगरुन ठेवल्या होत्या. येथील मासळी विक्रेत्यांना आज मासळी बाजार बंद ठेवण्याची सूचना करण्यात आल्याने बायणा, सडा व शहर भागातील मासळी बाजार बंद होते. तसेच शहर भाग, बायणा, मांगोरहिल, नवेवाडे, सडा येथील काही अपवाद वगळता हॉटेल, दुकाने, इतर व्यवहार पूर्णपणे बंद होते. सडा चौकापर्यंत चौपदरी महामार्ग नेण्यात येणार असल्याने बरीच बांधकामे मोडण्याची गरज आहे. एमपीटीने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध सडावासीयांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. यामध्ये सडा भागातील मिनी बस मालकही सामील झाल्याने नागरिकांचे हाल झाले.सकाळी खारीवाडा येथून नागरिकांनी मोर्चा काढून एमपीटीच्या अध्यक्षांविरोधात घोषणा दिल्या. नंतर मोर्चा मुरगाव बंदरातील नऊ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर दहा पंधरा टेम्पो आडवे तिडवे उभे करुन तसेच प्रवेशद्वार क्रमांक एकसमोरही काही टेम्पो उभे करून प्रवेशद्वारांचे मार्ग अडवण्यात आले. मच्छीमारी नौका व ट्रॉलर्स यांनी समुद्रतील जहाजांना धक्‍क्‍यांकडे येण्यास तसेच धक्‍क्‍यावरुन जाण्यात अटकाव केला. त्यामुळे मुरगाव बंदरातील व्यवहार ठप्प झाले. यानंतर सर्व मोर्चेकरी चौकात जमा झाले. तेथून त्यांनी एमपीटीच्या अध्यक्षांविरुद्ध घोषणा दिल्या आणि एमपीटीच्या प्रशासकीय इमारतीसमोर काळे बावटे दाखवून निदर्शने केली. यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मोर्चात अभियानाचे पदाधिकारी, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, मुरगावच्या प्रभारी नगराध्यक्षा सौ. अनिता चोपडेकर, नगरसेवक कार्लूस आल्मेदा, सेबी परेरा, सैफुल्ला खान, आर्नाल्ड रेगो, नगरसेविका सौ. शांती मांद्रेकर, रोहिणी परब, सौ. लविना डिसोझा, नगरसेवक शेखर खडपकर, राजेश घोणसेकर नगरसेविका किशोरी हळदणकर, चिखली ग्रामस्थ कृती समितीचे अध्यक्ष लिगोरियो मोंतेरो आदी सहभागी झाले होते.एमपीटीच्या प्रशासकीय इमारतींच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर सुमारे दोन तास मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर एमपीटीचे उपमुख्य अभियंते टायटस मोराईस यांनी अभियानाशी बोलणी करण्याची तयारी दाखविली, मात्र अध्यक्ष प्रवीण अगरवाल यांच्याखेरीज अन्य कोणाशीही आम्ही बोलणी करणार नाही, अशी भूमिका अभियानने घेतली. त्यानंतर एमपीटीचे उपाध्यक्ष आश्‍विनकुमार वैष्णव, सचिन एन एस मडकईकर, मुख्य तांत्रिक अभियंता श्री. कुचेरिया, अभियंता श्री. लोखंडे बोलणी करण्यासाठी आले असता, मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अध्यक्ष अगरवाल बोलणी करण्यासाठी प्रवेशद्वारा समोर आले. यावेळी अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर काही प्रश्‍न उपस्थित करताना त्यांच्यावर आरोप केले. अगरवाल यांनी एमपीटीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि, आम्हाला स्पष्टीकरण नको, आम्ही जे निवेदने दिले त्यासंदर्भात बोला असे सांगून त्यांचे म्हणणे ऐकण्यास नकार देण्यात आला. यावेळी दक्षिण गोवाचे जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी संयमाने स्थिती हाताळली. अगरवाल यांनी आपली बाजू पत्रकारांमार्फत तुमच्यासमोर ठेवतो, असे अभियानच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी अगरवाल यांची प्रतिमा जाळली व सर्वजण तेथून पांगले. बंद आणि मोर्चाप्रसंगी अनुचित प्रकार घडू नये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स, मामलेदार पुंडलीक खोर्जुवेकर, संयुक्त मामलेदार शेरू शिरोडकर, उपअधीक्षक देवू बाणावलीकर, अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, निरीक्षक उत्तम राऊत देसाई, नोलास्को रापोस आदींनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.

Sunday, February 10, 2008

गोव्यातील मंदिरसंस्कृतीचा खरा परिचय का नाही?

-डॉ. पांडुरंग फळदेसाई हे संस्कृतीचे एक आदर्श केंद्र मानले जाते। संपूर्ण भारतातील मंदिरव्यवस्थापनाने आणि जगातील धार्मिक स्थळांनी आदर्श घ्यावेत असे अनेक पैलू आपल्या मंदिरसंस्कृतीकडे आहेत. परंतु गोव्यातील या मंदिरसंस्कृतीची पुरेपूर ओळख परराज्य आणि परदेशात होण्यामध्ये एक महत्त्वाची अडचण आड येते असे अनेकांना वाटते. त्यातील एका अभ्यासकाची मनोव्यथा या लेखात मांडण्यात आली आहे.
कला आणि संस्कृतीच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून अनेक वेळा गोवा आणि नजीकच्या प्रदेशात भ्रमंती होते. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू, दस्तऐवज आणि इतिहासाच्या खुणा जपणारी अनेक स्थळे यांची भेट अशा अभ्यासदौऱ्यात अपरिहार्य ठरते. अन्य सर्व स्थळांबरोबरच मशिदी, चर्चेस आणि मंदिरे यांचीही भेट घेणे ओघानेच आले. भेट दिल्यावेळी अनेक गोष्टींची नोंद घ्यावी लागते. एखाद्या वस्तूची रचना, लांबी रुंदी, कलाकुसरीची शैली, रंगसंगती, यांच्या तपशिलाची जशी नोंद करावी (डॉक्‍युमेंटेशन) लागते, तशीच मूर्तीविज्ञानाच्या दृष्टीने तपशील घ्यावा लागतो.मूर्तीविज्ञान हा खास अभ्यासाचा विषय असल्याने मूर्तीचे छायाचित्रण, ध्वनिचित्र-फिती घेणे अपरिहार्य ठरते. कधी-कधी या वास्तूची रचना, रंगसंगती, अंतर्गत कलाकुसर, पारंपरिक आरास, सौंदर्यपूर्ण दैवतमूर्ती, त्या मूर्तीवरील आभूषणे, सजावट पद्धत, विविध विधींच्या वेळचा अलंकार (अळंकार) हे पाहणाऱ्या साध्या सुध्या माणसाला, भाविकाला भुरळ पाडणारे असते. मग इतिहास, संस्कृतीच्या अभ्यासकाला तर किती परम महत्त्वाचे आणि अपरिहार्य असेल याची कल्पना केलेली बरी.संशोधनाचे काम म्हणूनच नव्हे तर आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रमनिर्मितीचा भाग म्हणून माझा अनेक वेळा मशिदी, चर्चेस आणि मंदिराकडे संपर्क आला आहे. मशिदी आणि चर्चेसच्या बाबतीत एक स्वागतार्ह दृष्टिकोन सदैव अनुभवास आला आहे. तो म्हणजे संबंधित अधिकारी व्यक्तीकडे संपर्क साधल्यावर सर्व संबंधितांकडून छायाचित्रण व ध्वनिफीत घेण्याच्या कामी संपूर्ण सहकार्य केले जाते. किंबहुना अंतर्भागातील अनेक वस्तू आणि दालने उत्स्फूर्तपणे उलगडून दाखविली जातात. त्यामागची संकल्पना, पार्श्‍वभूमी विशद केली जाते. एखाद्या अभ्यासकाला, पर्यटकाला, होतकरू युवकाला, ही वागणूक आणि सहकार्याची वर्तणूक अपेक्षित असते. ती तशी मिळाल्यावर तो मनोमन आनंदित होतो. आपण कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या अनेक सुंदर गोष्टी तो आपल्या मित्रांना आणि इतरांना आवर्जून दाखवतो. आयुष्यात एकदा तरी अशा सुंदर वास्तू आणि स्थळे पाहण्याची मनापासून आणि आग्रही शिफारस करतो. शाश्‍वत सुंदरतेच्या अनुभूतीचा संदेश तो जगभर पोचविण्यासाठी धडपडत असतो.मात्र याला अपवाद गोव्यातील हिंदूमंदिरे, गोव्यात येणारा प्रत्येक देशी आणि खासकरून परदेशी संशोधक, इतिहासकार, साहित्यिक, सामान्य संस्कृतीप्रेमी जेव्हा गोव्यातील प्रसिद्ध मंदिरात जातो, तेव्हा तेथे ठळक सूचनावजा फलक दिसतो. छायाचित्रण अथवा ध्वनिचित्रणास सक्त मनाई आहे. (फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी स्ट्रिक्‍टली प्रोहिबिटेड-बाय ऑर्डर) त्यामुळे वर उल्लेखित कोणताही माणूस छायाचित्रण व ध्वनिचित्रमुद्रण करण्याचे धाडस करीत नाही. कारण तसे केल्यास देवस्थानचे कर्मचारी निश्‍चितच आडकाठी करतात. कधी-कधी एखाद्याने धाडस केलेच तर कॅमेरा हिसकवण्याचे अथवा कॅमेऱ्यातील फिल्म काढून घेण्याचे प्रकारही नवीन नाहीत. परंतु असे मनाई फलक न लावलेली काही मंदिरे अपवाद आहेत.छायाचित्रणाला, ध्वनिमुद्रणाला "सक्त मनाई' करण्याची कारणे मुख्यत: दोन असू शकतात. 1. कॅमेऱ्यांचे प्रकाशझोत पुन्हा-पुन्हा एखाद्या प्राचीन अतिप्राचीन मूर्तीवर पडल्यामुळे एखाद्या मूर्तीचे वैज्ञानिकदृष्ट्या नुकसान होते. तसे मूर्तीविज्ञानविषयक नुकसान टाळणे.2. संबंधित देवस्थानने तयार करून विक्रीसाठी ठेवलेले फोटोग्राफ मोठ्या प्रमाणावर खपावेत. किंबहुना अन्य कोणालाही दैवताचा फोटो काढण्याची किमान संधीही न देणे.तिसरे कारण सोवळेपणा, पावित्र्य आणि अनवधानाने एखाद्या मूर्तीची आक्षेपार्ह छबी जनमानसात जाऊ नये, असे असू शकते. पण ते कारण असल्यास सक्त मनाईची सूचना लावण्यावर पर्याय ठेवता आला असता. त्यामुळे तिसरी शक्‍यता येथे लागू करता येत नाही.वरीलपैकी पहिले कारण संभवत नाही. मूर्तीविज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्राचीन मूर्तीचे नुकसान टाळण्याचे भान असल्यास सरसकट मनाई आदेश सर्वच मंदिरातून कसा काय असू शकतो? दुसऱ्या कारणाचा संभव अधिक वाटतो. केवळ तुटपुंज्या व्यवहार्य फायद्याच्या दृष्टिकोनातून आमची गोव्यातील हिंदू मंदिरे फार मोठी चूक करीत आहेत. हे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो. मंदिरांना भेट देणाऱ्या पर्यटकांना तसेच इतिहास-मूर्तिविज्ञानप्रेमींना, संस्कृतिअभ्यासकांना छायाचित्रण, व्हिडिओग्राफी करण्यास मज्जाव केल्याने गोव्याबाहेरील प्रांतात आणि खासकरून विदेशात आपल्या प्राचीन हिंदू परंपरेचा संदेश पोचत नाही. कलात्मक आणि वैविध्यपूर्ण गोमंतकीय मंदिर संस्कृतीची चित्रफीत जात नाही. जाते ती इथल्या चर्चेस आणि मशिदीची चित्रफीत, छायाचित्रे आणि वर्णने त्यामुळे गोव्याबाहेर आणि परदेशातही गोव्याच्या खऱ्याखुऱ्या वास्तविक संस्कृतीविषयी गैरसमजच अधिक पसरतात. गोवा हे पूर्वेकडील रोम हा पर्यटनखात्याचा दावा खरा ठरण्यास आमची गोवाभर पसरलेली एकाहून एक सुंदर मंदिरे आणि त्या मंदिराच्या देवस्थान समिती (कार्यकारी मंडळ, महाजन मंडळ आणि पर्यायाने कुळावी, भजक, अर्चक) कारणीभूत ठरते.गोव्यात 65 ते 70 टक्के हिंदूचे वास्तव्य, त्यांची गोवाभर असलेली मंदिरे, त्यांचे सण, व्रतवैकल्ये, उत्सव, जत्रा, विधी, परंपरा अभिव्यक्त करणारी हिंदू संस्कृती केवळ अशा मंदिरातील मनाई आदेशामुळे अन्य देशांपर्यंत पोचत नाही ही वस्तुस्थिती सर्वच देवस्थान समित्यांनी समजून घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपणच आपल्या मंदिरसंस्कृतीचे नकळत फार मोठे नुकसान करीत आहोत, याची जाणीव सर्वच देवस्थान कमिट्यांनी ठेवून स्वत:ला सुधारून घेतले पाहिजे.परदेशातून आलेले पर्यटक, अभ्यासक आपल्या देशात जाऊन लेखन करतात. त्यातून चर्चेस आणि मशिदीच्या अंतर्भागाची सुंदर छायाचित्रे, चर्चमधल्या मुख्य दैवताचा अल्तार यांची विलोभनीय छायाचित्रे प्रसिद्ध होतात. मात्र आमच्या मंदिराचे बाह्य फोटो तेवढेच दिसतात. आतली समृद्धी आणि सौंदर्य यांचे दर्शन छायाचित्रांतून येत नाही. मग गोमंतकीय मंदिरसंस्कृतीची महती कोण सांगेल?आमच्या देशातील कोणत्याही देवस्थानांनी आदर्श घ्यावा अशी गोव्यातील अनेक देवस्थाने आहेत. स्वच्छता, टापटीप, पावित्र्य, शिस्त, तीर्थप्रसाद देण्याची, सांगणी (गाऱ्हाणे) करण्याची, पूजाअर्चेच्या वेळी पाळावयाची पथ्ये, पावती देण्याची पद्धत हे सर्व वाखाणण्याजोगे गोमंतकीय मंदिर व्यवस्थापनाचे गुण आहेत. फक्त एकच खटकणारी गोष्ट ती छायाचित्रण मनाई आदेश. आता तरी आम्ही अंतर्मुख होऊन सुधारणा करूया. सर्वच मंदिर व्यवस्थापन समित्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून गोव्याच्या मंदिरसंस्कृतीच्या वैश्‍विक प्रसारास हातभार लावावा, असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.

Thursday, February 7, 2008

राष्ट्रीय महामार्ग : मृत्यूचा सापळा!


नईबाग-मालपे नाका: पाच वर्षांत 94 अपघात, 87 जखमी, 15 बळी


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. 17 वरील नईबाग नाका ते मालपे नाक्‍यापर्यंतचा चार किलो मीटर अंतराचा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलाच जणू बनला आहे. गेल्या महिन्यात या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच अकरा जणांचे बळी गेले व दहा जण गंभीर जखमी झाले. याआधी झालेल्या अपघातांत अनेकांना आपले अपघातात जीव गमवावे लागले आहे, तर काही प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले आहे. यावरून या ठिकाणच्या रस्त्याची आखणी अयोग्य पद्धतीने झाली आहे याची सहज कल्पना येते.अपघात प्रवण क्षेत्रातील या रस्त्यावर मुंबईकडून गोव्यात येताना पहिले अपघात स्थळ हे नईबाग (पुलाजवळील) नाका. येथे सुमारे दीड किलो मीटरची उतरण आहे. ती संपते तिथेच वळण असून याच ठिकाणी पेडण्यात जाणारा रस्ता जोडला आहे. वळणामुळे या ठिकाणी समोरून येणारी वाहने अजिबात दिसत नाहीत. शिवाय सूचनाफलक नसल्याने येथे नाका असल्याची कल्पना नवख्या चालकांना नसते. यामुळे या ठिकाणी अधूनमधून अपघात होत असतात. वेगात आलेल्या वाहनाला या वळणावरील अपघात चुकविण्यात कसेबसे यश आले तरी, चालकाचे नियंत्रण गेल्यामुळे तिथून पंचवीस तीस मीटर अंतरावरील पुलाच्या कठड्याला धडक बसण्याचीही शक्‍यता असते.या ठिकाणाहून पुढे तीस पस्तीस मीटर अंतरावर महामार्गाला सातार्डा पुलावरून जाणारा रस्ता जोडलेला आहे. याठिकाणीही नेहमी अपघात होत असतात. याशिवाय नईबाग ते मालपे नाक्‍यापर्यंत लहान मोठी मिळून सात वळणे आहेत. या सातपैकी तीन-चार वळणांवर हमखास अपघात होतात.

Tuesday, February 5, 2008

परप्रांतियांच्या विरोधात "मनसे'ची भूमिका योग्य आहे का? आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.

नवनिर्माण सेना नेत्यांना अटक
मुंबई, ता. 5 - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादंगाचे पडसाद आज तिसऱ्या दिवशीही उमटले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज पोलिसांनी शिवाजी पार्क येथे मनसे उपाध्यक्ष शिशिर शिंदे, आमदार बाळा नांदगावकर, मनसे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार या पदाधिकाऱ्यांसह 17; तर अंधेरी येथे कॉंग्रेस प्रवक्ते संजय निरूपम यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या 47 अशा 64 कार्यकर्त्यांना अटक केली.शिवाजी पार्क येथून अटक केलेल्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. अंधेरी येथे अटक झालेल्या कार्यकर्त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.समाजवादी पक्षाने रविवारी घेतलेल्या देश बचाव रॅलीनंतर शहरात मराठी विरुद्ध उत्तर भारतीय संघर्षाला सुरुवात झाली. मनसे आणि समाजवादी पक्षातील या संघर्षात संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांविरोधी वक्तव्यावर आक्षेप घेतला. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी आज अंधेरीच्या संभाजीनगर परिसरात सहार रोड येथे असलेल्या संजय निरुपम यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. काही संतप्त कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या बंद कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला; त्यात एका टॅक्‍सीची काच फुटली. नंतर पेलिसांनी या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांनी 47 कार्यकर्त्यांना अटक केली. यात नऊ महिलांचाही समावेश आहे, अशी माहिती परिमंडळ-10 चे पोलिस उपायुक्त के. एम. के. प्रसन्ना यांनी दिली.शिवाजी पार्क परिसरात आज सकाळपासून मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अटकेचे सत्र सुरू होते. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेना भवन, मनसेचे मुख्यालय असलेले "राजगड', तसेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर पोलिस तैनात करण्यात आले होते. आज सकाळीच मनसेचे उपाध्यक्ष शिशिर शिंदे यांना पोलिसांनी अटक केली. त्यापाठोपाठ आमदार बाळा नांदगावकर व विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्यो नऊ; तर कॉंग्रेस प्रवक्ते संजय निरुपम यांच्या सहा कार्यकर्त्यांना या वेळी अटक झाली. या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भोईवाडा न्यायालयाने आज सायंकाळी जामिनावर मुक्त केले.

Saturday, February 2, 2008

अतिरेकी कारवाया हाताळण्यास राज्याची सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे का? प्रतिक्रिया नोंदवा

गोव्यात बॉम्बस्फोटांचा कट
इस्रायलींवर हल्ल्याची योजना

पणजी, ता. 3, प्रतिनिधी - गोव्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे दहशतवाद्यांचे नियोजन होते, असा कट नुकताच हैदराबाद येथे उघडकीस आला आहे. येथे येणाऱ्या इस्रायली पर्यटकांना येथील ठराविक समुद्र किनाऱ्यांवर लक्ष्य बनविण्याचे लष्कर-ए-तैयबा व हरकत-उल-जिहादी-अल-इस्लामी या संघटनांचे नियोजन होते व यासाठी मोटारसायकलींची (बाईक) चोरीही दहशतवाद्यांनी केली होती, या खळबळजनक माहितीचा उलगडा हैदराबाद येथे अटक केलेल्या रझिउद्दिन नसीर याने पोलिस चौकशीच्या वेळी केला आहे. नसीर व कर्नाटकचा असादुद्दिन अबुबकर यांना हैदराबाद येथील बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी ही माहिती उघडकीस आली. आतापर्यंत 12 राज्यांचे पोलिस व गुप्तचर यंत्रणांनी नसीर याची चौकशी केली आहे. 25 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे घडवून आणण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांनंतर नसीर गोव्यात आला होता. स्फोट घडवून आणण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असलेल्या समुद्रकिनाऱ्यांची चाचपणी व निवड करण्याच्या मोहिमेवर तो होता, असे त्याने सांगितले आहे. 22 वर्षीय नसीर हा अभियांत्रिकी विद्यार्थी असून त्याने पाकिस्तानमधील हुजी प्रशिक्षण केंद्रात दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले. गोव्यात मोठ्या प्रमाणात इस्रायली पर्यटक येत असल्याने आपण गोव्याची निवड केल्याचे त्याने म्हटले आहे. हे स्फोट तो नेमके कसे घडवून आणणार होता, ती योजना त्याने स्पष्ट केलेली नाही, तरी गोव्यातील चार समुद्र किनाऱ्यांवर बॉम्बस्फोटांचे नियोजन होते, असे त्याने म्हटले आहे.लखनौ, वाराणसी व गोरखपूर येथील बॉम्बस्फोटांमध्ये मोटारसायकलींचा स्फोट घडवून आणण्यासाठी वापर करण्यात आला होता. नसीर व त्याचा साथीदार अबुबकर यांच्याकडून दावणगिरी पोलिसांनी चोरीच्या 11 मोटारसायकली ताब्यात घेतल्या. चैनीसाठी या मोटारसायकली त्यांनी चोरल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले असले, तरी त्यांनी त्या अन्यत्र विकल्या नाहीत अथवा वापरून टाकून दिल्या नाहीत. हीच बाब चिंतनीय व मोटारसायकल चोरी करण्यामागील हेतू उघड करण्यास पुरेशी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गोव्यात स्फोट घडवून आणण्यासाठी त्याने एजंटकडून 50 किलोच्या स्फोटकांसाठी व्यवहार केला होता. या एजंटचे नाव व तो व्यवहार नेमका कसा झाला, ही माहिती त्याने उघड केलेली नाही. नसीर याने काही गटांशी साधलेला दूरसंपर्क गुप्तचर संस्था व पोलिसांनी "टॅप' केल्यामुळे नसीर तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला.
___________________________________________________________________________________
सतर्क राहू - गृहमंत्री
दरम्यान, या प्रतिनिधीने गृहमंत्री रवी नाईक यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, हैदराबाद पोलिसांना संशयितांनी दिलेली माहिती खरी असेल, तर ते
धक्कादायकच आहे. आम्हाला सतर्क राहावे लागेल. गोवा पोलिस सर्व प्रकारे काळजी घेतच आहेत, असेही ते म्हानाले.


___________________________________________________________________________________

दहशतवाद्यांचे नियोजन



  • गेल्या वर्षअखेर चार समुद्रकिनाऱ्यांची चाचपणी

  • चोरलेल्या मोटारसायकलींचा बॉम्बस्फोटासाठी

  • इस्रायली पर्यटक संभाव्य लक्ष्य

  • 50 किलो स्फोटकांचा व्यवहार