Friday, February 22, 2008

पालिका कर्मचाऱ्यांची कचरा न उचलण्याची भूमिका योग्य आहे का? प्रतिक्रिया नोंदवा।







पणजीतील कचरा उचलणे बंद
कर्मचारी संपावर - महापौर मारहाणीचा निषेध
पणजी, ता। 22, प्रतिनिधी -
महापौर टोनी रॉड्रिग्ज तसेच आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्रशासन व सफाई कामगार संघटनेने बेमुदत संप सुरू केला आहे. संपाची घोषणा आज दुपारी करण्यात आली, तरी कचरा उचलण्याचे काम काल रात्रीपासूनच बंद असल्याने पणजीत सर्वत्र कचरा साठला आहे. मारहाणीस जबाबदार असलेल्या पोलिसांविरुद्ध सरकारने कडक कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. व्हिंटेज इस्पितळात उपचार घेत असलेले टोनी रॉड्रिग्ज यांची स्थिती नाजूक आहे. अजूनही ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. पोलिसांनी बेदम मारहाण करून 19 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या इस्पितळाच्या दारात नेऊन त्यांना टाकले. शहराच्या प्रथम नागरिकाला पोलिसांकडून मिळालेली वागणूक संतापजनक आहे. या एकंदर प्रकरणी पोलिसांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करावा. महापौरांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांविरुद्ध तक्रार नोंदविली जाणार आहे। आवश्‍यकता भासल्यास महापालिका मंडळातर्फे पोलिसांत तक्रार नोंदविली जाईल, असे कार्यकारी महापौर यतीन पारेख आज पत्रकार परिषदेत सांगितले.पणजीतील नगरसेवक व आयुक्तांची आज सकाळी बैठक झाली. यावेळी महापौरांच्या अनुपस्थितीमुळे दैनंदिन कामकाजासाठी महापौरपदाचा ताबा आपल्याकडे सोपविण्यात आल्याचे पारेख यांनी सांगितले. बेदम मारहाणीमुळे त्यांची जी स्थिती झाली आहे त्याचा परिणाम महापालिका कर्मचाऱ्यांवर झाला आहे. महापौरांना तसेच मोन्सेरात कुटुंबीयांना झालेली मारहाण व त्यांच्या मालमत्तेच्या तोडफोडीबाबत न्यायालयीन चौकशी करून यास जबाबदार ठरणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंद करावा. मारहाणीत गुंतलेल्या पोलिसांची बदली करून कारवाई केल्याचे नाटक न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक अविनाश भोसले यांनी केली. मोन्सेरात कुटुंबीय व महापौरांना झालेल्या मारहाणीची मानवी हक्क आयोगानेही दखल घेऊन जबाबदार पोलिसांविरुद्ध कडक कारवाईची मागणी नगरसेवक रेजिना आल्मेदा यांनी या पत्रकार परिषदेवेळी केली.दरम्यान, या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिका कामगार संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला, असे संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी कळविले आहे. लोकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.



1 comment:

Unknown said...

कचरा उचलणे बंद करणे अयोग्यच
पणजीच्या महापौरांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील कचरा उचलणे बंद केले. हा प्रकार म्हणजे आग रामेश्‍वरी आणि बंब सोमेश्‍वरी असा आहे. महापौरांना पोलिसांकडून मारहाण झाली तर लोकांना कशाला वेठीस धरायचे. त्यांनी पोलिसांपुढेच जाऊन निषेध नोंदवला पाहिजे होता किंवा तिथे जाऊन धरणे, मोर्चा वगैरे काय करायचे ते करायला हवे होते. कुठल्याही गोष्टीविरूद्ध निषेध वगैरे काही नोंदवायचा असतो तो असा दोन तीन दिवस काम बंद ठेवून नोंदवायचा नसतो. मुळात कामगारांना यात पडण्याची काहीच गरज नव्हती. महापौरांबद्दल प्रेम व्यक्त करायचेच होते तर लाक्षणिक निषेध नोंदवून ते करता आले असते. असे लोकांना वेठीस धरून आणि लोकांच्या आरोग्याशी खेळून नव्हे.
रमाकांत नाईक