Thursday, August 14, 2008

विमानतळ पेडणे आणि गोव्यासाठीही कितपत फायदेशीर ठरेल? याबाबतची आपली मते नोंदवा.

मोपाच्या धावपट्टीवर वाढतेय अपेक्षांचे ओझे..!
पेडणे, ता. १४ - येथे विमानतळासाठी आता परत भू संपादन प्रक्रया जोरात सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच विमानतळ होईल व त्यातून रोजगाराचा प्रश्‍न सुटेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प नाही. त्यामुळे विमानतळ झाल्यास सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असे गृहीतक आता मांडले जात आहे. बेरोजगारीची समस्या चुटकीसरशी सुटणार आहे अशी येथील सर्व सामान्य लोकांची भावना आहे. रोजगार मिळेल या आशेने सर्व सामान्यांच्या अपेक्षा बऱ्याच उंचावलेल्या आहेत.
बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरातील रचना व प्रवासी यात फरक आहे. पण, या परिसरातील सर्वसामान्य माणूस विमानतळ परिसरात चहा स्टॉल, लहान हॉटेल, दुकान, वडापाव विकणे असा व्यवसाय तरी करता येईल अशा अपेक्षा ठेवून आहे.

Wednesday, August 13, 2008

"कचरा समस्येवर काय उपाय आहे की नाही? याबाबतची आपली मते नोंदवा.

पर्वरी पठारालाही कचऱ्याचा विळखा
पणजी, ता. १३ - सुशिक्षितांचे वसतीस्थान असे समजले जाणारे व गोवा विधानसभा, मंत्रालय, सचिवालय प्रकल्प सामावून घेणारे पर्वरी पठार सध्या कचरा समस्येच्या विळख्यात सापडलेले आहे. यामुळे या परिसराला हळूहळू दुर्गंधीयुक्‍त बकाल स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. त्यामुळे रोगांच्या फैलावाचीही भीती निर्माण झाली आहे.
जागा नसल्याच्या व लोकांना शिस्त नसल्याच्या कारणास्तव पर्वरी पठारावरील पेन्ह द फ्रान्स पंचायतीच्या प्रभाग सात ते अकरा परिसरातील कचरा कधी कधी महिना दोन महिने उचललाच जात नाही. या कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्याकडेला असलेल्या घरांच्या दारात, उद्यानात जाऊन पडतात. उघड्यावर कचरा टाकलेल्या ठिकाणी गुरे, कावळे, कुत्र्यांची गर्दी असते. पंचायत म्हणते लोकांना शिस्त नाही. तर दुसरीकडे नागरी सुविधा पुरविण्यास पंचायत कमी पडते, पर्वरी पालिका होणेच योग्य ठरेल असा दावा नागरिक करीत आहेत.

"कचरा समस्येवर काय उपाय आहे की नाही? याबाबतची आपली मते नोंदवा.

पर्वरी पठारालाही कचऱ्याचा विळखा
पणजी, ता. १३ ः सुशिक्षितांचे वसतीस्थान असे समजले जाणारे व गोवा विधानसभा, मंत्रालय, सचिवालय प्रकल्प सामावून घेणारे पर्वरी पठार सध्या कचरा समस्येच्या विळख्यात सापडलेले आहे. यामुळे या परिसराला हळूहळू दुर्गंधीयुक्‍त बकाल स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. त्यामुळे रोगांच्या फैलावाचीही भीती निर्माण झाली आहे.
जागा नसल्याच्या व लोकांना शिस्त नसल्याच्या कारणास्तव पर्वरी पठारावरील पेन्ह द फ्रान्स पंचायतीच्या प्रभाग सात ते अकरा परिसरातील कचरा कधी कधी महिना दोन महिने उचललाच जात नाही. या कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्याकडेला असलेल्या घरांच्या दारात, उद्यानात जाऊन पडतात. उघड्यावर कचरा टाकलेल्या ठिकाणी गुरे, कावळे, कुत्र्यांची गर्दी असते. पंचायत म्हणते लोकांना शिस्त नाही. तर दुसरीकडे नागरी सुविधा पुरविण्यास पंचायत कमी पडते, पर्वरी पालिका होणेच योग्य ठरेल असा दावा नागरिक करीत आहेत.

गोव्याला मेगा प्रकल्पांची गरज आहे का व ग्रामस्थांचा विरोध पत्करुन ती उभारणे परवडणारे आहे का? याबाबतची आपली मते नोंदवा.

पिळर्णमध्येही धुमसतोय "मेगा'असंतोष...!
पर्वरी, ता. १२ : अलीकडच्या काळात मेगा प्रकल्पांचा शापच गोव्याला लागलेला आहे, असे दिसते. मात्र याविरुद्ध ठिकठिकाणी ग्रामस्थ लढताही दिसत आहेत. यात भर पडलीय ती पिळर्ण येथील मेगा हाउसिंग प्रकल्पाची. पायाभूत सोयी-सुविधांच्याबाबतीत आधीच दुर्लक्षित असलेला हा गाव या मेगा प्रकल्पामुळे अडचणींच्या गर्तेत आणखी रुतत जाईल, अशी भीती येथील ग्रामस्थांना लागून राहिली आहे.
र्-पिळर्ण मानशेर येथे होऊ घातलेल्या या मेगा हाउसिंग प्रकल्पाला येथील नागरिक जोरदार विरोध करीत आहेत. त्यांनी या संबंधीचे निवेदन मुख्यमंत्री, स्थानिक आमदार आणि ग्रामपंचायतीला सादर केले आहे. हा प्रकल्प सर्व्हे क्रमांक ८६/२ या ७६०० चौ. मीटर जागेत आणि सर्व्हे क्र. ७८/० या ९६०० चौ. मीटर जागेत साकारणार असून त्यात अनुक्रमे ५४ आणि ६८ असे एकूण १२२ व्हिला (इमारती) तयार होणार आहेत, शिवाय दोन तरणतलावांचाही या प्रकल्पात समावेश आहे.

Monday, August 11, 2008

"माशेलला कलामंदिराची गरज कितपत?' याबाबतची आपली मते नोंदवा.

माशेलला गरज कलामंदिराची...
ता. ११ : कलेचे माहेर घर... कलाकारांची खाण... विद्वान - पंडितांचे स्थान... देव-दैवतांची पवित्र पुण्यभूमी... अशा अनेक बिरुदांनी गोमंतकात "माशेल' गावाचे मोठेपण सांगितले जाते. संगीत, नृत्य, चित्र, साहित्य इत्यादी कलांचीही वैभवशाली परंपरा या गावाला लाभली आहे. मात्र असे असले तरी, हे वैभव आणि मोठेपण जतन करण्यासाठी येथे कलामंदिर किंवा रवींद्र भवनाची व्यवस्था नाही, ही या गावासाठी आणि गोमंतकासाठीही खेदाची अशीच गोष्ट आहे. येथील कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी येथे रवींद्र भवन होणे गरजेचे आहे, अशीच प्रतिक्रिया अनेक माशेलकरांनी व्यकेली.
माशेल येथे असलेल्या बहुतेक सर्व मंदिरांसमोर सभामंडप असले तरी, या मंदिरांतून वर्षभर होणारे धार्मिक उत्सव, लग्न सोहळे यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह किंवा थिएटर मिळणे येथे कठीण असते. येथे महाशाला कलासंगम, नटेश रंगभूमी, मराठी साहित्य सहवास, साईकला मंडळ, विठोबा कल्चरल माशेल कला प्रेमी, ड्रॅमॅटिक असोसिएशन, साने गुरुजी कथामाला केंद्र, मराठी संस्कार केंद्र, पत्रकार संघ आदी सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था कार्यरत आहेत. याशिवाय शारदा हायस्कूल, सरकारी उमाध्यमिक विद्यालय व सरकारी महाविद्यालय खांडोळा या शैक्षणिक संस्थाही आहेत. या संस्थांना कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास सभागृह किंवा थिएटरची उणीव नेहमीच भासत असते. एखाद्या व्यावसायिक संस्थेचे नाटक, तियात्र किंवा अन्य कार्यक्रम तिकीट विक्रीद्वारे करायचे ठरवले तरी, हजारभर प्रेक्षक बसू शकेल असे प्रेक्षकालय येथे नाही. माशेल फोंडा व पणजी शहरांना मध्यवर्ती असल्यामुळे येथे कलामंदिराची नितांत गरज आहे.

पुरणशेती वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? याबाबतची आपली मते नोंदवा.

सत्तरीतील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत...
वाळपई, ता. ५ -सत्तरीत पुरणशेती करणारे शेतकरी गेली पाच वर्षे नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. गेली अनेक वर्षे शेतकरी दोन महिने काम करून पुरणशेतीमार्फत दुप्पट पीक काढत होते. पण, आता सरकारने नद्यांवर बंधारे बांधल्यामुळे त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाली आहे.
सत्तरीत म्हादई व रगाडा या दोन नद्यांवर ९५७ शेतकरी पुरणशेती करत असत. मात्र त्यांची ही शेती आता बंद पडली आहे. यामुळे कृषी खात्याच्या अंदाजपत्रकानुसार दरवर्षी सुमारे २८ लाख १८ हजार १५० रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत आतापर्यंत बराच पत्रव्यवहार झाला असला तरी शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

Monday, August 4, 2008

साळावळी धरणाच्या निर्वासितांना न्याय मिळायला एवढा विलंब का? याबाबतची आपली मते नोंदवा.

कुर्डीतील ८९ कुटुंबे अजूनही निर्वासितच
सांगे, ता. ४ दक्षिण गोवा "सुजलाम्‌' व्हावा या शुद्ध हेतूने गोव्याचे शिल्पकार भाऊसाहेब बांदोडकर यांनी साळावली धरणाची निर्मिती केली. या घटनेला आज ३५ वर्षे होत आली. मात्र ज्याची ओळख "त्यागभूमी' अशी झाली त्या कुर्डी गावातील ८९ कुटुंबे आजही वाडे - कुर्डी येथील "स्थलांतर भूमीत' निर्वासिताचे जिणे जगत आहेत. त्यांचा गाव हलवण्यापूर्वी त्यांना दिलेली आश्‍वासने पाळण्यात आली नाहीत. त्यामुळे ना घरासाठी जागा ना, शेतीसाठी जमीन अशी त्यांची अवस्था आहे!
१९७२ साली साळावली धरणासाठी कुर्डी येथे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. तत्पूर्वी भाऊसाहेब कुर्डी गावात येऊन ग्रामस्थांच्या सभा घेऊन कुर्डीवासीयांना गोव्यासाठी धरणाची आवश्‍यकता कशी आहे हे पटवून सांगत होते. त्यावेळी कुर्डीतल्या प्रत्येक कुटुंबीयांना ४०० चौ.मी. घरासाठी भूखंड व शेतीसाठी २०,००० चौ. मी. जागा देण्याचे मान्य केले होते. पण, त्यांच्या आश्‍वासनाला त्यानंतर आलेल्या राणे सरकारने हरताळ फासत २०,००० च्या जागी शेतीसाठी १०,००० चौ. मी. जागा देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली.