Tuesday, February 5, 2008

परप्रांतियांच्या विरोधात "मनसे'ची भूमिका योग्य आहे का? आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.

नवनिर्माण सेना नेत्यांना अटक
मुंबई, ता. 5 - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादंगाचे पडसाद आज तिसऱ्या दिवशीही उमटले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज पोलिसांनी शिवाजी पार्क येथे मनसे उपाध्यक्ष शिशिर शिंदे, आमदार बाळा नांदगावकर, मनसे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार या पदाधिकाऱ्यांसह 17; तर अंधेरी येथे कॉंग्रेस प्रवक्ते संजय निरूपम यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या 47 अशा 64 कार्यकर्त्यांना अटक केली.शिवाजी पार्क येथून अटक केलेल्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. अंधेरी येथे अटक झालेल्या कार्यकर्त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.समाजवादी पक्षाने रविवारी घेतलेल्या देश बचाव रॅलीनंतर शहरात मराठी विरुद्ध उत्तर भारतीय संघर्षाला सुरुवात झाली. मनसे आणि समाजवादी पक्षातील या संघर्षात संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांविरोधी वक्तव्यावर आक्षेप घेतला. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी आज अंधेरीच्या संभाजीनगर परिसरात सहार रोड येथे असलेल्या संजय निरुपम यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. काही संतप्त कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या बंद कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला; त्यात एका टॅक्‍सीची काच फुटली. नंतर पेलिसांनी या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांनी 47 कार्यकर्त्यांना अटक केली. यात नऊ महिलांचाही समावेश आहे, अशी माहिती परिमंडळ-10 चे पोलिस उपायुक्त के. एम. के. प्रसन्ना यांनी दिली.शिवाजी पार्क परिसरात आज सकाळपासून मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अटकेचे सत्र सुरू होते. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेना भवन, मनसेचे मुख्यालय असलेले "राजगड', तसेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर पोलिस तैनात करण्यात आले होते. आज सकाळीच मनसेचे उपाध्यक्ष शिशिर शिंदे यांना पोलिसांनी अटक केली. त्यापाठोपाठ आमदार बाळा नांदगावकर व विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्यो नऊ; तर कॉंग्रेस प्रवक्ते संजय निरुपम यांच्या सहा कार्यकर्त्यांना या वेळी अटक झाली. या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भोईवाडा न्यायालयाने आज सायंकाळी जामिनावर मुक्त केले.

5 comments:

sakaal papers said...
This comment has been removed by the author.
sanjayghugretkar said...

"मनसे'ची भूमिका अयोग्यच!
आजच्या बदलत्या आणि महासत्तेकडे झेप घेणाऱ्या भारत देशाला "मनसे'सारख्या संघटनाची परप्रांतीयांच्या विरोधातील घेतलेली भूमिका अयोग्य आहे. कारण शिवसेनेने स्वतःच्या निर्मितीपासून मराठी माणसासाठी कार्य करण्याचा प्रयत्न केला, त्याला किती यश मिळाले? सत्ता हाती येताच मराठी माणसाच्या समस्या, अडचणी, मागण्या ते विसरून गेले. स्वतःचा स्वार्थ मात्र त्यांनी साधला. त्यामुळेच शिवसेनेची शकले झाली. संघटनेचे राणे, भुजबळांनी इतर पक्ष जवळ केले. आता राज मुंबईत हैदोस, धिंगाणा घालून काय मिळविणार आहे? महाराष्ट्रात जसे इतर प्रांतातील लोक राहातात, त्याच प्रमाणे इतर प्रांतातही मराठी माणूस राहातो, तेथे त्याला अद्याप कोणीही परप्रांतीय म्हणून त्रास दिला नाही.
हैदराबाद, इंदोर, तंजावर, दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश या प्रदेशात मराठी माणूस आपला व्यवसाय, धंदा, नोकरी व्यवस्थितपणे करीत आहे. "मनसे'सारखी भूमिका इतर प्रांतात घेतली, तर तेथील मराठी माणसांचे काय होईल, याचा विचार राज ठाकरे यांनी केलाय का? मनसेची ही कृती म्हणजे महाराष्ट्राबाहेरील लाखो मराठी माणसांचे जीवन संकटात टाकण्यासारखी आहे. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्‍न अजूनही भिजत पडलाय, सीमाभागातील जनता अस्सल मराठी असून कर्नाटकात डांबली गेलीय, त्यांच्याकडे महाराष्ट्रातील नेते मंडळी विरोधात असताना खूप चांगले बोलतात, आश्‍वासने देतात. बेळगावात येऊन भलीमोठी भाषणे ठोकतात. सत्ता मिळताच सर्व विसरून जातात. अशा आजकालच्या बोलक्‍या पुढाऱ्यांमुळेच सीमाप्रश्‍नांचे घोंगडे इतकी वर्षे भिजत पडले आहे. याबद्दल राजला थोडी तरी कल्पना आहे का?
परप्रांतीय आपल्या राज्यात येतात, येथे ते आपण जी कामे करीत नाही, ज्या कामात आपण कमी पडतो किंवा काही कामे करण्यास आपल्याला लाज वाटते, अशी सर्व प्रकारची कामे परप्रांतीय करतात. त्यांची खरे तर आपल्याला गरज असते. ते आपल्या राज्यात यायला नको असतील तर सर्व प्रकारची कामे स्वतः करायला हवीत. आवश्‍यक कष्टाची कामे जर आपण केलीत, तर इतरांना ती संधी मिळणार नाही. ते आपल्या राज्यात येणार नाहीत.
"मनसे'ने परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा मराठी युवकांना आजच्या परिस्थितीत ताठ मानेने उभे करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. मराठी युवकांनी कोणते शिक्षण घ्यावे, कोणता धंदा करावा, याविषयीचे मार्गदर्शन "मनसे'सारख्या संघटनांनी केले पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात काय पिकते, ते त्याच प्रकारचे पीक घेतले पाहिजे, तरच शेतकरी जगू शकतो, जोमाने विकास करू शकतो. त्याचप्रमाणे मराठी माणसांना मोठे करण्याची तळमळ असेल तर राज ठाकरेने अ"राज'क निर्माण करण्यापेक्षा मराठी माणसाला मोठे होण्यासाठी योग्य दिशा द्यायला हवी.
- संजय घुग्रेटकर

oconcept said...

हे तर निवडणुकांचे डोहाळे
हा सारा प्रकार पाहता आगामी लोकसभा तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे डोहाळे साऱ्याच राजकारण्यांना लागले असल्याचे वाटते. लहान मुले थोडा कच्चा आंबाही दाबून दाबून पिकवायचा प्रयत्न करतात. आंबा थोडा मऊ होतो पण पिकत नाही. पण थोडा मऊ झालेला आंबा त्या मुलाला पिकल्यासारखा वाटतो. नेमका असाच प्रकार राज ठाकरेंबाबत घडत आहे. राज ठाकरेंचा आंबा पिकला तर मग आपण काय खायचे या भीतीने सारेचजण आपापला आंबा दाबून पिकवू पाहत आहेत. जागतिकीकरण आणि इंग्रजीच्या आक्रमणामुळे जगभर देशा-प्रदेशातील प्रादेशिकतेच्या सीमा व्हर्चुअल बनू पाहताहेत. जग कुठे निघाले आहे आणि आपण कोठे निघालो आहोत याचा राजकारण्यांनी थोडा तरी विचार करण्याची गरज आहे. अमेरिकेत ओबामा-हिलरी यांच्यात किती अटीतटीची पण सकारात्मक पद्धतीने लढत सुरू आहे ते पाहावे. त्यापासून भारतीय राजकारण्यांनी धडा घ्यावा.
अमिताभ बच्चनने मराठी चित्रपटात काम केले नाही हा काही मुद्दा नव्हे. तिकडे मराठी माणूस रजनीकांत हा तमीळ चित्रपटसृष्टीचा बादशाह झालाय. त्याने का आजवर मराठी चित्रपटात भूमिका केलेली नाही, हा प्रश्‍न राज ठाकरेंना विचारण्याची गरज आहे. तसेच चित्रपटात काम करताना पैशाचा विचार करता मराठी चित्रपटात आघाडीच्या नायकांना आजही किती मानधन मिळते याचा कधी विचार केला आहे का? तमीळ चित्रपटात तेथील स्थानिक नायकही कोट्याची भाषा बोलतात पण आजही मराठी चित्रपटात हजाराचा फार तर लाखाचाच भाव दिला जातो. हा फरक ओळखूनच ठाकरेनी खडा मारावा.
- जय

Ganesh said...

The responsibility of the aggrevated situation lies with the underdeveloped states in the north......

the contineous influx of the migrants from the neighbouring underdeveloped states towards the developed ones is a natural phenomenon. Goa is also at the threshhold of this population saturation. The local Tax payers have the limit to bear the burden on infrastructure. However the violent approach towards the migrants may aggrivate the situation for the maharashtrians in the concerned states. These migrants will now spread accross other developed states like goa. if the situation in mumbai ultimately leads to the arrest of outflow of migrants from the source states in the north through the long lasting efforts of government machinery, then it can be considered a constructive agitation. viable Employment generation for the unskilled in primary sector is a core issue here.

Unknown said...

परप्रांतीय भाषाच विसरा!
आता परप्रांतीय ही भाषाच विसरायला हवी. कारण आपण पहिले भारतीय आहोत; त्यानंतर एका प्रांतांचे रहिवासी आहोत, हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्रात "मनसे'ने जी भूमिका अंवलबली आहे, ती चुकीची आहे. एका चुकीच्या केलेल्या वक्‍त्याव्यामुळे वादाचा मोठा भडका उडू शकतो. हे आपण देशभरात पहात आहोत. महाराष्ट्राने उत्तर भारतीयांना परप्रांतीय म्हणून हाकलले तर इतर राज्यातील मराठी माणसांवर हीच पाळी येणार आहे. रोजगारासाठी स्थलांतर करायलाच हवे. प्रत्येक राज्याने आपल्या सीमा इतर राज्यातील नागरिकांसाठी बंद केल्या तर विकास होणार नाही. पक्षाचे अस्तित्व निर्माण करा पण, अशा माध्यामातून नको.