-डॉ. पांडुरंग फळदेसाई हे संस्कृतीचे एक आदर्श केंद्र मानले जाते। संपूर्ण भारतातील मंदिरव्यवस्थापनाने आणि जगातील धार्मिक स्थळांनी आदर्श घ्यावेत असे अनेक पैलू आपल्या मंदिरसंस्कृतीकडे आहेत. परंतु गोव्यातील या मंदिरसंस्कृतीची पुरेपूर ओळख परराज्य आणि परदेशात होण्यामध्ये एक महत्त्वाची अडचण आड येते असे अनेकांना वाटते. त्यातील एका अभ्यासकाची मनोव्यथा या लेखात मांडण्यात आली आहे.
कला आणि संस्कृतीच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून अनेक वेळा गोवा आणि नजीकच्या प्रदेशात भ्रमंती होते. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू, दस्तऐवज आणि इतिहासाच्या खुणा जपणारी अनेक स्थळे यांची भेट अशा अभ्यासदौऱ्यात अपरिहार्य ठरते. अन्य सर्व स्थळांबरोबरच मशिदी, चर्चेस आणि मंदिरे यांचीही भेट घेणे ओघानेच आले. भेट दिल्यावेळी अनेक गोष्टींची नोंद घ्यावी लागते. एखाद्या वस्तूची रचना, लांबी रुंदी, कलाकुसरीची शैली, रंगसंगती, यांच्या तपशिलाची जशी नोंद करावी (डॉक्युमेंटेशन) लागते, तशीच मूर्तीविज्ञानाच्या दृष्टीने तपशील घ्यावा लागतो.मूर्तीविज्ञान हा खास अभ्यासाचा विषय असल्याने मूर्तीचे छायाचित्रण, ध्वनिचित्र-फिती घेणे अपरिहार्य ठरते. कधी-कधी या वास्तूची रचना, रंगसंगती, अंतर्गत कलाकुसर, पारंपरिक आरास, सौंदर्यपूर्ण दैवतमूर्ती, त्या मूर्तीवरील आभूषणे, सजावट पद्धत, विविध विधींच्या वेळचा अलंकार (अळंकार) हे पाहणाऱ्या साध्या सुध्या माणसाला, भाविकाला भुरळ पाडणारे असते. मग इतिहास, संस्कृतीच्या अभ्यासकाला तर किती परम महत्त्वाचे आणि अपरिहार्य असेल याची कल्पना केलेली बरी.संशोधनाचे काम म्हणूनच नव्हे तर आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रमनिर्मितीचा भाग म्हणून माझा अनेक वेळा मशिदी, चर्चेस आणि मंदिराकडे संपर्क आला आहे. मशिदी आणि चर्चेसच्या बाबतीत एक स्वागतार्ह दृष्टिकोन सदैव अनुभवास आला आहे. तो म्हणजे संबंधित अधिकारी व्यक्तीकडे संपर्क साधल्यावर सर्व संबंधितांकडून छायाचित्रण व ध्वनिफीत घेण्याच्या कामी संपूर्ण सहकार्य केले जाते. किंबहुना अंतर्भागातील अनेक वस्तू आणि दालने उत्स्फूर्तपणे उलगडून दाखविली जातात. त्यामागची संकल्पना, पार्श्वभूमी विशद केली जाते. एखाद्या अभ्यासकाला, पर्यटकाला, होतकरू युवकाला, ही वागणूक आणि सहकार्याची वर्तणूक अपेक्षित असते. ती तशी मिळाल्यावर तो मनोमन आनंदित होतो. आपण कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या अनेक सुंदर गोष्टी तो आपल्या मित्रांना आणि इतरांना आवर्जून दाखवतो. आयुष्यात एकदा तरी अशा सुंदर वास्तू आणि स्थळे पाहण्याची मनापासून आणि आग्रही शिफारस करतो. शाश्वत सुंदरतेच्या अनुभूतीचा संदेश तो जगभर पोचविण्यासाठी धडपडत असतो.मात्र याला अपवाद गोव्यातील हिंदूमंदिरे, गोव्यात येणारा प्रत्येक देशी आणि खासकरून परदेशी संशोधक, इतिहासकार, साहित्यिक, सामान्य संस्कृतीप्रेमी जेव्हा गोव्यातील प्रसिद्ध मंदिरात जातो, तेव्हा तेथे ठळक सूचनावजा फलक दिसतो. छायाचित्रण अथवा ध्वनिचित्रणास सक्त मनाई आहे. (फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड-बाय ऑर्डर) त्यामुळे वर उल्लेखित कोणताही माणूस छायाचित्रण व ध्वनिचित्रमुद्रण करण्याचे धाडस करीत नाही. कारण तसे केल्यास देवस्थानचे कर्मचारी निश्चितच आडकाठी करतात. कधी-कधी एखाद्याने धाडस केलेच तर कॅमेरा हिसकवण्याचे अथवा कॅमेऱ्यातील फिल्म काढून घेण्याचे प्रकारही नवीन नाहीत. परंतु असे मनाई फलक न लावलेली काही मंदिरे अपवाद आहेत.छायाचित्रणाला, ध्वनिमुद्रणाला "सक्त मनाई' करण्याची कारणे मुख्यत: दोन असू शकतात. 1. कॅमेऱ्यांचे प्रकाशझोत पुन्हा-पुन्हा एखाद्या प्राचीन अतिप्राचीन मूर्तीवर पडल्यामुळे एखाद्या मूर्तीचे वैज्ञानिकदृष्ट्या नुकसान होते. तसे मूर्तीविज्ञानविषयक नुकसान टाळणे.2. संबंधित देवस्थानने तयार करून विक्रीसाठी ठेवलेले फोटोग्राफ मोठ्या प्रमाणावर खपावेत. किंबहुना अन्य कोणालाही दैवताचा फोटो काढण्याची किमान संधीही न देणे.तिसरे कारण सोवळेपणा, पावित्र्य आणि अनवधानाने एखाद्या मूर्तीची आक्षेपार्ह छबी जनमानसात जाऊ नये, असे असू शकते. पण ते कारण असल्यास सक्त मनाईची सूचना लावण्यावर पर्याय ठेवता आला असता. त्यामुळे तिसरी शक्यता येथे लागू करता येत नाही.वरीलपैकी पहिले कारण संभवत नाही. मूर्तीविज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्राचीन मूर्तीचे नुकसान टाळण्याचे भान असल्यास सरसकट मनाई आदेश सर्वच मंदिरातून कसा काय असू शकतो? दुसऱ्या कारणाचा संभव अधिक वाटतो. केवळ तुटपुंज्या व्यवहार्य फायद्याच्या दृष्टिकोनातून आमची गोव्यातील हिंदू मंदिरे फार मोठी चूक करीत आहेत. हे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो. मंदिरांना भेट देणाऱ्या पर्यटकांना तसेच इतिहास-मूर्तिविज्ञानप्रेमींना, संस्कृतिअभ्यासकांना छायाचित्रण, व्हिडिओग्राफी करण्यास मज्जाव केल्याने गोव्याबाहेरील प्रांतात आणि खासकरून विदेशात आपल्या प्राचीन हिंदू परंपरेचा संदेश पोचत नाही. कलात्मक आणि वैविध्यपूर्ण गोमंतकीय मंदिर संस्कृतीची चित्रफीत जात नाही. जाते ती इथल्या चर्चेस आणि मशिदीची चित्रफीत, छायाचित्रे आणि वर्णने त्यामुळे गोव्याबाहेर आणि परदेशातही गोव्याच्या खऱ्याखुऱ्या वास्तविक संस्कृतीविषयी गैरसमजच अधिक पसरतात. गोवा हे पूर्वेकडील रोम हा पर्यटनखात्याचा दावा खरा ठरण्यास आमची गोवाभर पसरलेली एकाहून एक सुंदर मंदिरे आणि त्या मंदिराच्या देवस्थान समिती (कार्यकारी मंडळ, महाजन मंडळ आणि पर्यायाने कुळावी, भजक, अर्चक) कारणीभूत ठरते.गोव्यात 65 ते 70 टक्के हिंदूचे वास्तव्य, त्यांची गोवाभर असलेली मंदिरे, त्यांचे सण, व्रतवैकल्ये, उत्सव, जत्रा, विधी, परंपरा अभिव्यक्त करणारी हिंदू संस्कृती केवळ अशा मंदिरातील मनाई आदेशामुळे अन्य देशांपर्यंत पोचत नाही ही वस्तुस्थिती सर्वच देवस्थान समित्यांनी समजून घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपणच आपल्या मंदिरसंस्कृतीचे नकळत फार मोठे नुकसान करीत आहोत, याची जाणीव सर्वच देवस्थान कमिट्यांनी ठेवून स्वत:ला सुधारून घेतले पाहिजे.परदेशातून आलेले पर्यटक, अभ्यासक आपल्या देशात जाऊन लेखन करतात. त्यातून चर्चेस आणि मशिदीच्या अंतर्भागाची सुंदर छायाचित्रे, चर्चमधल्या मुख्य दैवताचा अल्तार यांची विलोभनीय छायाचित्रे प्रसिद्ध होतात. मात्र आमच्या मंदिराचे बाह्य फोटो तेवढेच दिसतात. आतली समृद्धी आणि सौंदर्य यांचे दर्शन छायाचित्रांतून येत नाही. मग गोमंतकीय मंदिरसंस्कृतीची महती कोण सांगेल?आमच्या देशातील कोणत्याही देवस्थानांनी आदर्श घ्यावा अशी गोव्यातील अनेक देवस्थाने आहेत. स्वच्छता, टापटीप, पावित्र्य, शिस्त, तीर्थप्रसाद देण्याची, सांगणी (गाऱ्हाणे) करण्याची, पूजाअर्चेच्या वेळी पाळावयाची पथ्ये, पावती देण्याची पद्धत हे सर्व वाखाणण्याजोगे गोमंतकीय मंदिर व्यवस्थापनाचे गुण आहेत. फक्त एकच खटकणारी गोष्ट ती छायाचित्रण मनाई आदेश. आता तरी आम्ही अंतर्मुख होऊन सुधारणा करूया. सर्वच मंदिर व्यवस्थापन समित्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून गोव्याच्या मंदिरसंस्कृतीच्या वैश्विक प्रसारास हातभार लावावा, असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.
Sunday, February 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

2 comments:
सरकारचेच दुर्लक्ष
गोव्यात दरवर्षी हजारो पर्यटक येतात, त्याचप्रमाणे येथील निसर्ग संस्कृती, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक दस्तऐवज यांचा अभ्यास करण्यासाठीही अभ्यासक येतात. त्यांना गोव्याच्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन मिळत नाही, समुद्र किनाऱ्यावरील भडक दर्शन लाभते. परतीच्या प्रवासात ते गोव्याचे वेगळेच चित्र घेऊन ते निघतात.
गोव्यात ते जे चित्रीकरण करतात, ते समुद्र किनारे, रस्त्यांवरील बाजार, आगळी वेगळी दृश्ये सोबत घेऊन ते जातात. त्यांना येथील संस्कृती, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा परिचय होत नाही. देशी पर्यटकसुद्धा याच मार्गाने जातात, मंदिर परिसरात चित्रीकरण करण्यास मनाई केली जाते. त्यामुळे येथील शिल्पकला, सुंदर मंदिराची छायाचित्रे घेता येत नाहीत. शिवाय येथील संस्कृती, कलांचे दर्शन होईल, अशा लघुपटांची सी. डी., व्हिडिओ संच उपलब्ध नाहीत. सरकारने बाबतीत दुर्लक्ष केले आहे. गोव्यातील मंदिर संस्कृती, येथील लोकसाहित्य, लोककला, ऐतिहासिक स्थळ यांच्याविषयी विविध भाषेत सचित्र पुस्तके, सी. डी., ध्वनिफिती, चित्रफिती असे साहित्य निर्माण करायला हवे. कला व संस्कृती संचालनालय, माहिती खाते यांनी याकामी लक्ष दिले, तरच गोव्याची खरी संस्कृती जगाला कळेल, समजेल!.
- संजय घुग्रेटकर
गोव्यातील मंदिरांनी याचा अवश्य विचार करावा
गोव्यातील मंदिरसंस्कृतीचा खरा परिचय का नाही? हा डॉ. पांडुरंग फळदेसाई यांचा लेख वाचला. लेख विचारप्रवर्तक आहे. काही महत्त्वाच्या मंदिरांमध्ये छायाचित्रण करायला देत नाही ही वस्तुस्थितीच आहे. अनेकदा ही समस्या मलाही आलेली आहे. काही मंदिराचा काही भाग आवडला आणि त्याचा फोटो काढावा म्हटले तर तो काढायला मिळत नाही. निराश होऊन परतावे लागते. फोटो काढायला न देण्याचे कोणतेच समर्थनीय कारण दिसत नाही. मंदिरांनी फोटो काढायला न देणे म्हणजे मंदिराचे सौंदर्य झाकून ठेवल्यासारखेच आहे. डॉ. फळदेसाईनी उपस्थित केलेला आणखी एक मुद्दा पटण्यासारखा आहे. फोटो काढायला न दिल्याने परदेशी पर्यटकांना, अभ्यासकांना सौंदर्याचा खजाना घेऊन जाता येत नाही आणि जे घेऊन जाता येते त्याचा तेवढाच प्रसार होतो. गोव्यातील मंदिरांनी याचा अवश्य विचार करावा. गोव्यातील या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.
मिथुन
Post a Comment