Monday, February 18, 2008

फॅक्‍टरीतील घातक टाकाऊ पदार्थ नदीत सोडणे योग्य आहे का? प्रतिक्रिया नोंदवा.

विषबाधेने नदीतील मासे मृत
कुंभारजुवे पंचायत - प्रदूषण मंडळ व पोलिसांना माहिती
पणजी, ता. 18, प्रतिनिधी - रामभुवन वाडा - कुंभारजुवे येथील एका मासळी प्रक्रिया प्रकल्पातील टाकाऊ घातक द्रवपदार्थ नदीत सोडण्यात आल्याने त्याची विषबाधा होऊन मोठ्या प्रमाणात मासे मेले. मेलेले मासे पाण्याबरोबर किनाऱ्यावर येऊन पडले आहेत. या प्रकाराची माहिती कुंभारजुवे पंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ व फोंडा पोलिस स्थानकाला दिली आहे. उद्यापर्यंत यासंदर्भात संबंधित खात्यांमार्फत कारवाई सुरू होण्याची शक्‍यता आहे. नदीतील मासे मरून किनाऱ्यावर पडले असल्याची माहिती आज सकाळी तेथील एका स्थानिकाने पंचायतीच्या कारकुनाला दिली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सरपंच सुरेश नाईक व कारकुनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नदीत काही मेलेले मासे पाण्यावर तरंगत होते, तर काही किनाऱ्यावर पडले होते. हा मासळी प्रक्रिया प्रकल्प या नदीच्या बाजूलाच आहे. त्यामुळे या प्रकल्पातून सोडलेले घातक रसायन नदीच्या पाण्यात मिसळून हा प्रकार घडला असण्याची शक्‍यता पंचायतीतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. या नदीतील मासे स्थानिक लोक धरतात, मात्र या घटनेमुळे लोकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. या प्रकाराची माहिती बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्र, जुने गोवे पोलिस स्थानक, कुंभारजुव्याचे आमदार व मंत्री पांडुरंग मडकईकर यांना देण्यात आली आहे. आरोग्य केंद्र व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना या नदीच्या पाण्याचा नमुना घेऊन त्याची तपासणी करण्याची विनंती पंचायतीतर्फे करण्यात आली आहे.

2 comments:

Ganesh said...

The pollution of the water bodies due to the industries on the river banks, has been a lond debated issue. The high court of mumbai taking the cognizance of the same ordered the state government to have the zoning plan for the industries along river banks. The central po9llution control board has been sleeping over this draft zoning plan. The state pollution control board be hold responsible for any untoward incident, if it happens and should be made to pay the compensation to the victims. The loss to the state ex-chequer be recovered from the concerned polln. board officials salary.

sakaal papers said...

गोव्यात जलप्रदूषणही होतेय!
गोव्यात खाण व्यवसायामुळे काही तालुक्‍यात धूळ प्रदूषण होते. त्याचा फटका तेथील सर्वसामान्यांना बसतो. आता नदी किनारी असलेल्या रासायनिक प्रकल्पातून घातक पदार्थ नदीत मोकाट सोडले जात आहेत. त्यामुळे जलप्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. माशेल - कुंभारजुवे परिसरातील एका प्रकल्पातून परवा घातक पदार्थ नदीत सोडण्यात आल्याने गेले आठ दिवसात जवळच्या नदीतील मत्स उत्पादन धोक्‍यात आले आहे. घातक पदार्थामुळे मासे मरत आहेत. यासंबंधी संबंधितांकडे तक्रार करण्यात आली आहे. हे प्रकार वेळीच थांबले पाहिजे. त्यासाठी संबंधितावर कारवाई झाली पाहिजे. जलप्रदूषण करणाऱ्या प्रकल्पाचे परवाने रद्द करायला हवेत. भविष्यात घातक पदार्थ नदीच्या पाण्यात सोडले जाणार नाहीत, जलप्रदूषण होणार नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले पाहिजे.
- संजयसिंह पाटील.