Friday, August 1, 2008

गोव्यात दुग्धक्रांती आणण्यासाठी काय करण्याची आवश्‍यकता आहे? याबाबतची आपली मते नोंदवा.

गोवा "पोसतोय' बाहेरील दुधावर
ता. ३१ ः वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा आणि तोकड्या पडलेल्या नोकऱ्या यातील पर्याय म्हणून स्वयंरोजगाराकडे बरेच युवक वळले आहेत. काही अनिच्छेने स्वयंरोजगारात लक्ष घातलेल्यांनाही या व्यवसायाचे महत्त्व कळू लागले आहे. प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट करण्याचा मानस आणि व्यवसायाप्रती प्रामाणिकपणा या तीन सूत्रांवरच आज गोव्यात बऱ्याच पारंपरिक व्यवसायांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. त्यातीलच एक व्यवसाय दुग्धोत्पादनाचा!
यातील गोवा डेअरीने (दूध महासंघ) या व्यवसायाला हात दिला आहे. डेअरीकडे गोव्यातील सव्वाशेपेक्षा जास्त सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या दूध संस्था संबंधित आहेत. फोंडा तालुक्‍यातील तीस दुग्ध संस्था गोवा डेअरीशी सध्या दुधाचा व्यवसाय करतात. प्रतदिन सरासरी ४५०० लिटर दूध या दूध संस्थांमधून डेअरीला पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील दूध व्यावसायिक या दूध संस्थांना दूध देतात व नंतर या संस्थांकडून हे दूध गोवा डेअरीला. दुधाचे दर हल्लीच्या काळात वाढले असल्याने आणि गोवा डेअरीकडून चांगला दरफरकही मिळाला असल्याने दूध व्यावसायिकांना हा व्यवसाय काही प्रमाणात सुसह्य झाला असल्याचे एका पाहणीत निदर्शनास आले आहे. पण, सरकारी पातळीवर मात्र दूध व्यवसायाला बरकत येण्यासाठी आणखी सहकार्याची गरज असल्याची भावना या दूध व्यावसायिकांची आहे. गुरे पोसण्यासाठी लागणारा खर्च, त्यांची मशागत आणि प्रत्यक्षात दुधाचा पुरवठा व त्यातून मिळणारा नफा यांचा ताळमेळ घालताना बऱ्याच दुग्ध व्यावसायिकांचे गणित आजही चुकत आहे.
तसे पाहिले तर सरकारी पातळीवर दुग्ध व्यावसायिकांसाठी चांगल्या योजना आतापर्यंत आखल्या आहेत. पण या योजना राबवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो आहे. दुग्धोत्पादन वाढीसाठी आखण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रम प्रत्यक्षात दूध व्यावसायिकांपर्यंत पोचवण्यासाठी सरकार पातळीवर आवश्‍यक प्रयत्न होण्याची गरज दूध व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. पशुसंवर्धन खात्याच्या अखत्यारित येणारी इस्पितळे आणखी सुसज्ज करून त्याचा लाभ तळागाळातील लोकांना मिळणे गरजेचे आहे. गोवा दुधाच्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी सरकार योजना आखत असले तरी त्या साकार होण्यासाठी त्यात सुटसुटीतपणा येण्याची गरज आहे.

No comments: