Monday, February 25, 2008

"त्या' पोलिसांवर कारवाई योग्य ठरेल का? प्रतिक्रिया नोंदवा....

कचरा उचलला
पालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पणजी, ता. 25, प्रतिनिधी - मोन्सेरात कुटुंबीयांना व इतरांना केलेल्या मारहाणीमुळे पोलिसांविरुद्ध पालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनापुढे आज अखेर सरकारने नमते घेतले. पोलिस अधीक्षक मोहन नाईक, निरीक्षक सुदेश नाईक यांची त्वरित अन्यत्र बदली करण्याचा निर्णय आज सरकारने घेतला. पूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी जाहीर केले. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी आज संप मागे घेतला आणि कचरा उचलण्याचे काम पणजीत रात्री सुरू झाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, नगर विकास मंत्री ज्योकिम आलेमाव, मुख्य सचिव जे. पी. सिंग आदींची आज बैठक झाली. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे ठरले. मुख्यमंत्री व अन्य दोघे मंत्री नंतर इस्पितळात जाऊन महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनाही भेटले. तुम्हाला मारहाण केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी रॉड्रिग्ज यांना दिली.
संप मिटला असून राजधानीतील कचरा रात्रीपासूनच उचलला जाईल असे हंगामी महापौर यतीन पारेख व पालिका कामगार संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी जाहीर केले. त्यानंतर रात्री कचरा उचलणेही सुरू झाले.
गेल्या 19 रोजी पणजी, ताळगावात जे घडले त्यासंदर्भात आपल्याकडे बऱ्याच तक्रारी आल्या असून कायदेशीर सल्ला घेऊन चौकशीचा आदेश जारी केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कायदा कोणालाही हाती घेऊ दिला जाणार नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला. न्यायालयीन चौकशी होणार का? फक्त लोकप्रतिनिधींना केलेल्या मारहाणीचे तपासकाम केले जाईल का? असे प्रश्‍न पत्रकारांनी विचारले असता, त्याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असून चौकशी पूर्ण प्रकरणाची होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पणजीतील कचरा व्यवस्थापनासाठी जागा देण्याची प्रक्रिया जलदगतीने होईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दुपारी नगरसेवकांबरोबर झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती त्यांनी
दिली.
-----------------------------------------
निलंबनच हवे - आजगावकर
दरम्यान, लोकप्रतिनिधींना मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची केवळ बदली होणे पुरेसे नाही. त्यांना सेवेतून निलंबितच करावे, अशी मागणी पंचायत मंत्री बाबू आजगावकर यांनी केली आहे. आम्ही मंत्र्यांनी तशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली असल्याचे ते म्हणाले. पोलिसांना ज्यांनी मारहाण केली, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करावेत पण पोलिस अशा प्रकारे कुणालाही बेदम मारहाण करू शकत नाहीत, असे आजगावकर म्हणाले. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मात्र अखेर न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

3 comments:

Ganesh said...

Its true that the police officers used their "third degree" on the taleigao agitators at the initial stages itself. they might have crossed their limits. This invites the action from home department only to that extent and not further! but there is no way for babush and his company to be excused totally for their "power show" at at police station. The morale of the police should be kept intact keeping the political interference apart. one should not forget that Babush is the one who in connivance with the then "political dalals" (now in the government)and the builder lobby from dubai toppled past three governments. The coastal goa wa sold for the selfish interests causing irreparable damage for future goan generations. A major cause for the entry of mafia culture in goa. that is babush!!

Unknown said...

मोन्सेरात कुटुब आणि टोनी रॉड्रिग्स यांना झालेल्या मारहाणीचा परिणाम म्हणून पणजी पोलिस स्थानकावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मारच खायचा, उलटून प्रत्युत्तर द्यायचे नाही असे सरकारला वाटते काय? किंवा सरकारच दुतोंड्यासारखे असे म्हणावे लागेल. कारण पोलिस स्थानकावर हल्ला झाला तेव्हा पोलिसांनी काय करायचे? खुद्द बाबूश मोन्सेरात मोर्चात आहेत म्हटल्यावर पोलिसांनी काय करायचे याचे मार्गदर्शन सरकारमधील प्रमुख घटकांनी केल्याशिवाय पोलिसांनी ही कारवाई केलेली नसणार ही नक्की. प्रथम पोलिसांनी कारवाई केली हे योग्यच होती असा एक सूर निर्माण झाला होता. मात्र बाबूश यांच्यावर कारवाईचे धाडस दाखवले म्हणून सरकारला श्रेय मिळते असे दिसल्यावर काहीजणांनी विरोधाचा सूर लावला आणि तोच मोठा झाला. त्यामुळे मोन्सेरात कुटंबाला झालेल्या मारहाणीमुळे त्यांच्याबाजूने सहानुभुती व्यक्त करण्याची जणू अहमहमिकाच लागलेली आहे. साहजिकच सरकारलाही माघार घ्यावी लागलेली दिसते. म्हणजे जी कारवाई सरकारच्या पाठिंब्याशिवाय होणेच शक्‍य नव्हते त्याच कारवाईबद्दल त्यांना माघार घ्यावी लागली आहे. सरकारची ही कृती पोलिसांनाच तोंडघशी पाडणारी आहे. पोलिसांना जी मारहाण झाली त्याबद्दल कोण अक्षरही काढत नाही आहे. विरोधकाच्या दबावाला बळी पडून सरकारने या प्रकरणात पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. शिवाय कारवाईची भीती आहेच. यापुढे अशा प्रकारची कारवाई करताना पोलिसांना नक्की विचार करावा लागणार आहे. या निर्णयामुळे पोलिसांचे नीतिधैर्य खचेल हे नक्की. यासाठी त्यांना नैतिक आधार देण्याची गरज आहे. यासाठी कोण पुढे येईल. राजाराम नाईक

Unknown said...

ही ठोकशाही आवरा
बाबुश मोन्सेरात आणि त्यांच्या सेनेने पोलिस स्थानकावर केलेला हल्ला, त्याला विरोध करण्यासाठी पोलिसांनी केलेली मारहाण, तोडफोड, पहिल्या दिवशी पोलिसांना पाठिंबा देणाऱ्या पर्रीकरांचे दुसऱ्या दिवशी केलेले घूमजाव आणि दोन दिवसांनंतर आपल्या नेत्यावर अन्याय झाल्याचे लक्षात येताच पालिका कामगारांनी पुकारलेला संप, या घटना राज्यात कशी ठोकशाही सुरू आहे याचेच प्रत्यंतर आणून देत आहेत. पोलिस नेहमीच टीकेचे धनी होत असतात. याच पोलिसांनी आयटी हॅबिटेट प्रकरणात बाबुशची पाठराखण केली म्हणून त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढण्यात आले होते. पोलिस हाही शेवटी माणूस असतो, इतर चारचौघांसारखे त्याचेही राजकीय हितसंबंध असतात. तेच ते जोपासतही असतात. पण जेव्हा त्यांच्यावरच हल्ला केला जातो तेव्हा त्यांचाही राग अनावर होतो हेच बाबुशवरील हल्ल्याने दाखवून दिले. कोणीही यावे आणि टपली मारून जावे हे ते किती दिवस सहन करणार? दुसऱ्या दिवशी सर्वांनीच बाबुशची पाठराखण सुरू करून पोलिसांना मानवाधिकाऱ्याच्या पिंजऱ्यात उभे केले. युवक कॉंग्रेस नेत्यांना मारहाण झाली तेव्हा मानवाधिकारांचा भंग झाला नाही का? तेव्हा हा पुळका या नेत्यांना का आला नाही?
पालिका कर्मचारी हे सरकारी नोकर आहेत. त्यांना बाबुश किंवा टोनी पगार देत नाही तर आपल्या करातून सरकार तो देत असते. मग ते नियुक्त सदस्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी संप कसा करू शकतात? त्यांना कोणीच कसा जाब विचारत नाही? एरवी अत्यावश्‍यक सेवा म्हणून इस्मा का भस्मा की काय ते कलम लावणारे सरकार या वेळीच घाणीत का बसून राहिले? अंगणवाडी सेविकांचा या मारहाणीशी किंवा एकूणच प्रकरणाशी काय संबंध? त्यांनी पोलिसांचा निषेध का करावा? अनेक प्रश्‍न. अस्वस्थ करणारे आणि राज्याची वाटचाल ठोकशाहीच्या दिशेने जात असल्याचे सूचित करणारे.
कल्पेश मळीक