स्थलांतर अडचणीचे, पुनर्वसन रखडले...!
पणजी, ता. ११ ः न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थलांतर केले. परंतु पुनर्वसन रखडल्यामुळे पणजी महापालिका क्षेत्रातील गाडेवाल्यांची - स्टॉलवाल्यांची झालेली परवड आजही कायम आहे.
एकाच ठिकाणी केलेली त्यांची सोय, त्यात जवळजवळ एकसारखे व्यवसाय व त्यामुळे घटलेले ग्राहक यामुळे त्यांचे उत्पन्न मंदावत चालले आहे. त्यामुळे अनेकांनी ३० ते ४० टक्के गाडे भाडेपट्टीवर दिल्याचे प्रकार घडले आहेत. बहुसंख्य गाड्यांच्या परवान्यांचे गेली दोन तीन वर्षे नूतनीकरणही झालेले नाही हे विशेष.
स्थलांतर केल्यानंतर वर्ष दीड वर्षे पणजीतील गीता बेकरी नजीकचे गाडे बंदच असायचे. परंतु त्यातील काही गाड्यांनी आता नवे रूप घेतले आहे, तर तीन चार गाडे भाड्याने दिले गेल्यामुळे त्यात वेगवेगळे व्यवसाय चालू झाले आहेत. डॉन बॉस्को, मासान द आमोरीच्या ठिकाणीही थोडीफार तीच कथा आहे.
पणजीतील गाडेवाल्यांचे पुनर्वसन नवीन मार्केटच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या मजल्यावर करणारच ही पणजीचे महापौर टोनी रॉड्रिग्ज यांची भूमिका आहे, तर गाडेवाल्यांच्या प्रश्नासंदर्भातील फाइल नवे आयुक्त मेल्वीन वाझ यांनी अद्याप पाहिलेली सुद्धा नाही. मात्र महापालिकेने गाड्यांच्या पुनर्वसनासंदर्भात धोरण निश्चित करायला हवे, असे त्यांना वाटते. पुनर्वसन गाडेवाल्यांनाही हवे आहे परंतु ते तळमजल्यावरच, या मतावर गाडेवाले ठाम आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment