Monday, July 7, 2008

पावसाळ्यात होणारे बागायतींचे नुकसान कसे कमी करता येईल? याबाबतची आपली मते नोंदवा.

बागायतदारांच्या नुकसानीला वाली नाही?नेत्रावळी हा गाव गोव्यातील चेरापुंजी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दरवर्षी सर्वाधिक पावसाची नोंद नेत्रावळीत होत असते. सभोवताली पश्‍चिमघाट असल्याने नेहमीच वादळी पावसाची बरसात असते. पावसाच्या धो-धो बरसण्याबरोबर बागायतदारांचे नुकसानही तितक्‍याच प्रमाणात होत असते. नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई लहान शेतकऱ्यांना कमी जास्त प्रमाणात शासनाकडून मिळते, पण मोठ्या बागायतदारांचे नुकसान कोणी लक्षात घेत नाही.
एकदा घोंगावणारे वादळ बागायतीत शिरले की किती झाडापेडावर आपत्ती येते ते वादळ शमल्यानंतरच कळून येते. भरघोस उत्पन्न देणारा माड जर वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त होत असेल, तर बागायतीतील पोफळी, केळी व इतरांची काय हानी होत असेल याचा विचारच न केलेला बरा. बागायतदारांच्या बाबतीत केळी हे "कॅशक्रॉप' आहे, पण वादळी पावसात सर्वाधिक नुकसान केळींचे होत असल्याने बागायतदार हवालदिल होत असतो. परंतु या आपत्तीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही मोठ्या बागायतदारांच्या हानीचे मूल्यमापन केले जात नाही. त्यांना नुकसानभरपाईही मिळत नाही. ही स्थिती बागायतदारांच्या आणि शेतीच्या विकासाच्यादृष्टीने चिंतनीय आहे.

No comments: