पर्वरी मार्केट इमारतीची दयनीय अवस्था
पर्वरी, ता. ४ - विधानसभा संकुल, मराठी अकादमी आणि इतर आस्थापने पर्वरी परिसराची शान वाढवत असताना येथील मार्केट प्रकल्पाची इमारतीची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. या इमारतीत महिला तर सोडाच येथील पुरुष नागरिक जायचे धाडस करत नाही, अशी येथली सध्याची परिस्थिती आहे.वर्षानुवर्षे पडलेल्या वाड्यासारखी पर्वरी मार्केट इमारतीची अवस्था झाली आहे. या इमारतीच्या परिसरात कचरा अस्ताव्यस्त पडल्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. येथे स्थानिकांपेक्षा परराज्यातील मजुरांचे व्यवहार चालतात. रोज सकाळी-संध्याकाळी आवारात मजुरांची गर्दी पाहायला मिळते. मार्केट इमारतीतील घाण पाहून स्थानिक इकडे फिरकत देखील नाहीत. हा प्रकल्प पेन्ह- द- फ्रान्स पंचायतीच्या अखत्यारित येतो. पंचायतीतर्फे फक्त करवसुली नियमित केली जाते, नवीन मार्केट प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न मात्र केले जात नाहीत.१९७२ साली येथे मार्केट संकुल उभारण्यासाठी शहर आणि नगरनियोजन खात्याने कोमुनिदादकडून सुमारे पाच हजार चौ. मी. जागा संपादन करून गृहनिर्माण मंडळाच्या ताब्यात दिली. १९७५ साली गृहनिर्माण मंडळाने इमारत बांधण्यास सुरवात केली. सुमारे सात ते आठ लाख रुपये खर्च करून बांधलेले मार्केट संकुल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात देण्यात आले. या संकुलात ४४ दुकाने आहेत. शिवाय मासळी मार्केटदेखील आहे. नंतरच्या काळात मार्केट इमारतीच्या बाजूस भाजी विक्रेत्यांसाठी काही गाळे उभारण्यात आले. पहिली पाच वर्षे वगळता सार्वजनिक बांधकाम खात्याने या इमारतीच्या देखभालीकडे कधी लक्ष न दिल्याने इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. सुरवातीला मार्केटमधील गाळेधारकांकडून किमान १२० ते २२० रुपये भाडे आकारले जात होते. असे असूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले. सध्या मार्केट इमारतीत पावसाचे पाणी येते. तसेच स्लॅबचेही तुकडे पडलेले आहेतच, पण इमारतीच्या छतावर गवतही उगवले आहे.

No comments:
Post a Comment