प्रश्न स्पॉंज आयर्नचाप्रकल्पाला विरोध : काळ्या भुकटीचे साम्राज्य, आरोग्याच्या अनेक समस्या, लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे
शिगांव, ता. ५, वार्ताहर - काले येथील जैन उद्योगाच्या स्पॉंज आयर्न प्रकल्पाविरुद्ध लोकांत असंतोष धगधगत आहे. प्रकल्पाविरुद्ध ग्रामस्थांनी दंड थोपटले असून, यामुळे वरवर शांत दिसणारे आंदोलन यापुढील काळात अचानक पुन्हा जोर घेऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.सांगे तालुका क्षेत्रातील काले व सावर्डे पंचायत क्षेत्रात येणारा कुड्डेगाळ, आंबेउदक, देवनामळ, डुक्करकोंड, भटवाडा, कामदोर, वागयांमळ, कुयणामळ, हेदीमळ, सांतोण, मायना आदी वॉर्डांच्या मधोमध असलेल्या जैन उद्योग प्रकल्पामुळे या भागातील लोकांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊन ग्रामस्थांबरोबर त्याला विरोध करण्यासाठी पुढे राहणार असल्याचे आश्वासन माजी आमदार विनय तेंडुलकर यांनी ग्रामस्थांना काले पंचायतीत दिले होते. परंतु अखेर नदीकाठी व वॉर्डांच्या मधोमध हा प्रकल्प उभा राहिला आहे. त्यानंतर विरोधासाठी तेंडुलकर यांचा पत्ताच नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.प्रकल्प सावर्डेत, त्रास कालेत!याठिकाणी उभा राहिलेला जैन उद्योग प्रकल्प हा खरेतर सावर्डे पंचायत क्षेत्रात येतो. प्रकल्पातून निघणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम मात्र काले पंचायत क्षेत्रातील परिसरात जाणवत असतो. यामुळे लोकांना काळ्या भुकटीची वलये आणि कर्कश आवाज सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी २५ ऑक्टोबरपासून या कंपनीला इथे विरोध दर्शविला होता, पण कोणतेही सरकारी अधिकारी त्यांचे काहीही ऐकण्यास तयार नव्हते. या सर्वांचा या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी थेट संबंध असल्यानेच हा प्रकल्प उभा राहिला, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

No comments:
Post a Comment