Wednesday, June 25, 2008
मालिकांमधील महिलांची प्रतिमा : खरी की...?
टीव्ही हे सध्या मनोरंजनाचे आणि आणि माहिती मिळवण्याचे सर्वांत मोठे साधन बनले आहे. साहजिकच इथे करोडो रुपयांची उलाढाल होत असते. या माध्यमातून एकाच वेळी करोडो लोकांपर्यंत पोचता येते, हे या उद्योगात प्रवेश केलेल्या उद्योजकांनी जाणले आहे. त्यांचा प्रेक्षकवर्ग कोण हेही त्यांनी ठरवले आहे.टीव्ही संच घरात ठेवला जातो, त्यामुळे जास्त काळ घरात असणाऱ्या व्यक्तीच तो पाहू शकतात. महिला जास्त काळ घरातच असतात. त्यामुळे त्यांना जखडून ठेवता येईल, त्यांना खूष करता येईल, असे कार्यक्रम विविध चॅनेलवरून दाखवले जातात. त्यांच्यात जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग खेचायची स्पर्धाच चाललेली असते. या चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधून महिलांची जी प्रतिमा रंगवली जाते, त्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यासारखी परिस्थिती आहे. मालिकांमधील स्त्रियांची प्रतिमा हा चिंतेचा विषय ठरू शकतो. षडयंत्र रचणाऱ्या बायका, एकाच पुरुषासाठी भांडणाऱ्या बायका, आपल्याला आवडणारा पुरुष आपल्याला मिळणार नसेल तर दुसऱ्यालाही मिळू द्यायचा नाही असा चंग बांधणाऱ्या बायका, दुसऱ्याच्या संसाराला कशी काडी लावायची याचाच विचार दिवसरात्र करणाऱ्या बायका, कुटुंबांमधील ज्येष्ठांच्या मनात कसे गैरसमज निर्माण करायचे आणि त्याचा कसा फायदा उठवायचा याच्यातच आपली विद्वत्ता खर्च करणाऱ्या बायका अशा अनेक खलप्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा या मालिकांमधून रंगवल्या जातात. एका पुरुषाला दोन दोन, तीन तीन बायका, विवाहबाह्य संबंध, एका पुरुषाला सोडून सहज दुसऱ्या पुरुषाच्या गळी पडणे, असे प्रकार फार सफाईदारपणे आणि आपल्या संस्कृतीचा अंगभूत गुण असल्याप्रमाणे सहजपणे दाखवले जातात. प्रत्यक्ष जीवनात तसे असते का? समाजाचे प्रतिबिंब अशा मालिकांमधून उमटलेले असते, असे म्हणतात. वस्तुस्थिती तशी आहे का? भडक आणि दिखाऊ व्यक्तिमत्त्वाच्या महिला क्वचितच असतात. त्यांचेच उदात्तीकरण करून समाजापुढे कोणते चित्र उभे करण्याचा प्रयत्न या मालिकांमधून केला जातो? दुस्वास, दुजाभाव, मत्सर, हेवा करणाऱ्या काही महिला असतात. पण षडयंत्र रचून आपल्याच कुटुंबातील कोणाचा तरी पाडाव करण्याचा आणि त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला अभावानेच असतील. तरीही त्या रेखाटल्या जातात. शिवाय या महिलांचे कपडे, साड्या, दागिने, मोठमोठ्या घरातील वावर, त्यांचे राजेशाही जगणे यातूनही मालिका बघणाऱ्या प्रेक्षक महिलांच्या मनात लाइफस्टाइलची एक वेगळीच संकल्पना रुजवली जाते. त्याचा परिणाम आर्थिक कुवत नसलेल्या कुटुंबांवर होतो. जाहिरातीतून उभे राहणारे महिलांचे चित्र तर प्रक्षोभक, उच्छृंखल आणि शारीरिक प्रदर्शन करणारे असे आहे. काही जाहिरातीतून तर या महिला बीभत्स प्रकारचे हावभाव करताना दाखवल्या जातात. हा सगळा विषयच चिंता करण्यासारखा आहे. म्हणूनच या विषयी चर्चा होणे आवश्यक आहे. म्हणून या महिन्यात २७ जून रोजी "गोमन्तक'च्या ओपन फोरममध्ये हा विषय चर्चेला घेतला जाणार आहे.तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटते? तुम्ही याचे समर्थन करता काय? वाचक व या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या विषयाच्या अनुषंगाने आपली मते पत्र, इमेल, ब्लॉग, एसएमएसच्या स्वरूपात पाठवावी. शिवाय तुम्हाला शुक्रवारी ओपन फोरममध्ये सहभागी होऊन आपली मते प्रत्यक्षपणे मांडता येथील तसेच इतरांची मते ऐकता येतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment