तुयेतील चिरेखाण व्यवसाय - बागायती उद्ध्वस्त, शेतीवर टाच!
पेडणे, ता. ९ - निसर्ग संपन्न अशा तुये गावात शेतीचा मळा व काजू बागायती उद्ध्वस्त करून बेकायदेशीररीत्या चिरेखाण व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. या व्यवसायामुळे राज्यात बांधकामासाठी चिरे उपलब्ध झाले आणि काही मोजक्या लोकांना त्याचा फायदा झाला असला तरी, स्थानिक लोकांना मात्र यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. शिवाय त्याचे गंभीर दूरगामी परिणामही त्यांना सोसावे लागणार आहेत.तुये गावातील "सोणयेपालयेचे भोम' हा गावाच्या माथ्यावर असलेला शेतीचा मळा. तुये येथील श्री भगवती देवस्थानाचे महाजन हे या शेतीमळ्याचे जमीनदार व सुमारे ५० ते ६० शेतकरी त्यात भाताचे पीक घ्यायचे. गेल्या पाच-सहा वर्षांत त्यातील काही शेतकऱ्यांनी शेती करायची सोडून दिली. तेव्हा या शेतीच्या मळ्याकडे चिरे काढणाऱ्या व्यावसायिकांची वक्रदृष्टी गेली. शेती सोडून दिलेल्या काही शेतकऱ्यांना या चिरेखाण व्यावसायिकांनी तर काहीजणांना दलालांनी गाठून पैशांचे आमिष दाखवले. फार मोठी रक्कम न पाहिलेले काही गरीब शेतकरी सात आठ हजारांची किरकोळ रक्कम पाहून हुरळून गेले. त्यामुळे त्यांना आयती संधी चालून आली.इतकी वर्षे ज्यावर आपला उदरनिर्वाह चालतो, तो शेतीचा मळा उद्ध्वस्त करायला द्यायचा नाही, असे ठरवलेल्या प्रामाणिक शेतकऱ्यांची पर्वा न करता त्यांनी या मळ्यात उत्खनन सुरू केले. दोन्ही बाजूंनी चिरेखाणीसाठी उत्खनन व मधोमध किंवा बाजूला शेती करायची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांचे मळे अशी स्थिती निमार्ण झाली.

No comments:
Post a Comment