थिवी, ता. ४, वार्ताहर - शिरसई कोमुनिदादने केलेले भूखंड वाटप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोमुनिदादीवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. गोव्यात जागेचे दर गगनाला भिडले आहेत. याचा लाभ उठवण्याच्या हेतूने शिरसई कोमुनिदादने मोठी रक्कम आकारून भूखंडांची विक्री केली आहे. गावच्या गरजू लोकांना डावलून शिरसई कोमुनिदादीने "बाहेरच्या' लोकांकडून जादा पैसे घेऊन भूखंड वाटप केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळेच असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिरसई हा थिवी मतदार संघाचा एक प्रमुख भाग. बार्देशमधील कोकण रेल्वेचे प्रमुख रेल्वेस्थानक याच शिरसई गावात आहे. त्यामुळे रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांचे पाय प्रथम याच गावाला लागतात. चारी बाजूने हिरवीगार वनराई व त्यात समावलेले रेल्वेस्थानक त्यामुळे गावचे सौंदर्य खुलून दिसते. परंतु, याच खुलून दिसणाऱ्या सौंदर्यामुळे अनेकांची दृष्टी या गावाकडे वळली. अनेकजण आपल्याला या गावात एखादा भूखंड मिळावा म्हणून प्रयत्न करू लागले. त्यामुळे साहजिकच इथल्या जमिनींचे भावही वधारले. याचवेळी काही लोकांची नजर शिरसई कोमुनिदादच्या जागेकडे वळली. त्यांनी शिरसई कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला.शिरसई कोमुनिदादच्या जागेत घर बांधण्यासाठी परवाना देताना कोमुनिदादकडून सर्व सोपस्कार पूर्ण केल्याशिवाय भूखंड वितरित करण्यात आला असेल, तर त्याला ना हरकत दाखला पंचायतीने देऊ नये असा ठराव घेण्यात आला. ग्रामस्थ उघडपणे पोटतिडकीने कोमुनिदादीच्या व्यवहारांविरुद्ध बोलत आहेत. न्यायालयापर्यंत धाव घेण्याची तयारी लोकांनी ठेवली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment